दिवेआगरमध्ये लवकरच निसर्ग पर्यटन !

दिवेआगरमध्ये लवकरच निसर्ग पर्यटन !

पर्यटकांना नेहमीच भुरळ घालणारा श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारा आणि परिसरामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वन विभागांतर्गत कांदळवन प्रतिष्ठानच्या मदतीने लवकरच निसर्ग पर्यटन सुरू होणार आहे. त्यासाठी प्रतिष्ठानने याबाबतचे प्रशिक्षण गावातील कांदळवन सहव्यवस्थापन समितीला टप्प्याटप्प्याने देण्यास सुरुवात केली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने निसर्ग पर्यटन सुरू झाल्यास दिवेआगर, पर्यायाने रायगड जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला एक वेगळा आयाम मिळणार आहे.

निसर्गतः लाभलेला स्वच्छ, सुंदर समुद्र किनारा आणि मनमोहक वृक्षसंपदा यामुळे प्रथम येणारा पर्यटक दिवेआगरच्या कायम प्रेमात पडत असल्याने तेथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. अलिबाग, मुरुड, श्री क्षेत्र हरिहरेश्वर या पर्यटकांना नेहमीच खुणावत आलेल्या ठिकाणांच्या तुलनेत दिवेआगर काहीसे दुर्लक्षित राहिले होते. मात्र 1997 पासून सुवर्ण गणेशाच्या प्रकटनाने खर्‍या अर्थाने दिवेआगरच्या पर्यटनालाही ‘सुवर्ण दिन’ आले. आता सुवर्ण गणेश मंदिरासह प्राचीन मूर्ती असणारे रुपनारायण, सुंदर नारायण, उत्तरेश्वर मंदिर आणि इतरही महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी येणार्‍यांच्या गर्दीने गाव फुलून जात आहे.

दिवेआगरला येणार्‍या पर्यटकांची वार्षिक संख्या सरासरी लाखाच्या आसपास आहे. यामुळे खानावळ, हॉटेल्स, छोटे मोठे उद्योगधंदे सुरू झाले आहेत. त्यातून गावाला एक प्रकारचे आर्थिक स्थैर्य प्राप्त होत आहे. परंतु पर्यटक बहुतांशी सणवारातील सुट्टीत किंवा शनिवार, रविवार या दिवशीच प्रामुख्याने येत असल्याने एरव्ही शांतता असते. त्यामुळे दिवेआगरमध्ये बाराही महिने पर्यटक कसे येतील आणि पर्यायाने स्थानिक पर्यटन कसे वाढेल यासाठी सरपंच उदय बापट आणि सहकार्‍यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातूनच निसर्ग पर्यटनाची संकल्पना पुढे आल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला असता वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठान मार्फत हे साध्य होऊ शकेल असे समजले.

कांदळवन प्रतिष्ठानचा चमू दिवेआगरमध्ये पोहचला तेव्हा त्यांना परिसर अतिशय भावला. प्रतिष्ठानने गावामध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समिती स्थापन करून त्यांना प्रातिनिधिक स्वरुपामध्ये प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. यात सरपंच बापट, समिती अध्यक्ष महेश पिळणकर आणि 20 सदस्यांनी भाग घेतला. इको टुरिझमचे सहाय्यक संचालक वंदन झवेरी आणि क्षमता बांधणी, सहाय्यक संचालक प्रकल्प डॉ. शीतल पाचपांडे, प्रकल्प समन्वयक चैताली पाटील, संदेश अंभोरे, सहाय्यक संशोधक हर्षल कर्वे, मोहन उपाध्याय, वन परिक्षेत्र अधिकारी (कांदळवन कक्ष, अलिबाग) करिश्मा कवडे, उपजीविका तज्ज्ञ विराज दाभोळकर यांनी ३ दिवसांचे प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षणामध्ये कांदळवनाची माहिती प्रत्यक्ष कांदळवनामध्ये बोटीने जाऊन देण्यात आली. यामध्ये कांदळवनाच्या प्रजाती, त्यापासून उत्पन्न कसे मिळू शकते, त्याच्या विविध प्रजाती कशा ओळखाव्या, मानवाला त्याची होणारी मदत, त्याचे फायदे आणि कांदळवन नष्ट झाल्यानंतर त्याचे तोटे, त्याचप्रमाणे समुद्र किनारी जाऊन तेथे असणार्‍या शंख शिंपले, सूक्ष्म जीव, खेकडे आणि त्यांचे घर, समुद्र सफर, तसेच दिवेआगर परिसरामध्ये असणार्‍या पक्षी आणि त्यांच्या विविध जातींबाबत माहिती देण्यात आली.

निसर्ग पर्यटनाबाबत स्थानिकांना उत्सुकता आहे. पर्यटनात वाढ झाली तर ग्रामस्थ आणि परिसरातील जनतेला चांगल्या प्रकारे रोजगार मिळू शकेल.
-उदय बापट, सरपंच

इको टुरिझममध्ये स्थानिक जनतेचे सहकार्य मिळत आहे आणि पुढे ते वाढत राहील. तसेच कांदळवनाबाबत जागृती होऊन त्याचे संरक्षण होईल.
-वंदन झवेरी, सहाय्यक संचालक, इको टुरिझम

First Published on: December 15, 2019 7:04 AM
Exit mobile version