राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात आमदार राजू पाटील; दि.बा. पाटलांच्या नावासाठी रस्त्यावर उतरणार

राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात आमदार राजू पाटील; दि.बा. पाटलांच्या नावासाठी रस्त्यावर उतरणार

राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात आमदार राजू पाटील; दि.बा. पाटलांच्या नावासाठी रस्त्यावर उतरणार

नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरुन वाद पेटला आहे. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांची आहे तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. या वादात उडी घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विमानतळा दि. बा. पाटील किंवा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न देता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं, असं मत व्यक्त केलं. मात्र, राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या विरोधात त्यांचे आमदार राजू पाटील रस्त्यावर उतरणार आहेत.

दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून आज, २४ जूनला सिडकोला १ लाख लोकांचं घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राजू पाटील सहभागी होणार आहे. याबाबतची घोषणा त्यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मनसेनं पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली होती. परंतु, राज ठाकरे यांनी वस्तुस्थितीत मांडत नवी मुंबईतील विमानतळ हा मुंबई विमानतळाचा विस्तार आहे, त्यामुळे त्या विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहे, असं सांगितलं. मात्र, राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात राजू पाटील यांनी भूमिका घेतली आहे. राजू पाटली यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली.

राजू पाटील यांनी काय म्हटलंय?

राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे. त्यानंतर अनेकजण विपर्यास करुन त्याचा वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला. राहता राहिला प्रश्न २४ जूनच्या आंदोलनाचा. तर मी नम्रपणे आणि ठामपणे सांगू इच्छितो की हा मोर्चा आगरी, कोळी, कुणबी, कऱ्हाडी आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या भूमीपुत्रांनी काढलेला मोर्चा आहे.

राज्यभर जेव्हा मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मूकमोर्चे निघत होते, तेव्हा जनभावना आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो. आताच्या घडीला तर माझा पूर्ण समाज या आंदोलनात उतरला आहे. त्यांच्या भावनेचा आणि विचारांचा कुटुंबातील एक सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून मला आदर आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आपण इथवर पोहोचलो आहोत.

त्यामुळे राजकारणात असलो तरी लोकभावना आणि समाजकारण हेच माझं पहिलं प्राधान्य आहे. म्हणूनच ज्यांनी माझ्या संपूर्ण समाजाला आणि भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलंय, त्यांचा निषेध करण्यासाठी आणि भूमीपुत्रांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी या मोर्चात सहभागी होणार आहोत.

जय महाराष्ट्र,

मा. राजसाहेब ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत वस्तुनिष्ठ तांत्रिक बाजू मांडली आहे….

Posted by Raju Patil – Pramod Ratan Patil on Wednesday, 23 June 2021

First Published on: June 24, 2021 10:22 AM
Exit mobile version