नवनीत राणांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज , केंद्रीय नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार

नवनीत राणांना लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज , केंद्रीय नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार

खासदार नवनीत राणा यांना भायखळा जेलमधून सुटल्यानंतर लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्पॉन्डॅलिसिसच्या त्रासामुळे लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यावर नवनीत राणा ठाकरे सरकारवर निशाणा साधला. डिस्चार्ज मिळाल्यावर राणा दाम्पत्य दिल्ली दौरा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यामध्ये त्या केंद्रातील नेत्यांच्या भेटी घेऊ शकते. तसेच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल माहिती केंद्राला देणार असल्याची शक्यता आहे.

नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना बुधवारी मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, कागदपत्रांची पूर्तता न केल्याने राणा दाम्पत्याची गुरुवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून सुटल्यानंतर लगेचच नवनीत राणा यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. रवी राणाही पत्नीची काळजी घेण्यासाठी तुरुंगातून थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. शुक्रवारी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हेही नवनीत राणा यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. नवनीत राणा यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज दिला गेला. यानंतर राणा दाम्पत्य दिल्ली दौरा करणार असल्याची शक्यता आहे.

नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. लढण्याचा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्यावर दबाव टाकून कारवाई करत आहेत. मुख्यमंत्री राज्यात दौरे करत नाहीत. तसेच मंत्रालयातसुद्धा येत नाहीत. येत्या एक ते दिवसांत आम्ही दिल्लीतील नेत्यांना समस्या सांगणार असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी त्यांची एमआरआय चाचणीही करण्यात आली आहे. खासदार सध्या छाती, घसा आणि शरीराच्या इतर भागात दुखण्याच्या तक्रारींमुळे हैराण झाले आहेत. त्यांची संपूर्ण बॉडी चेकअपही करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केली होती. या कामासाठी ते अमरावतीतून बाहेर पडून मुंबईतही आले. मात्र, ते मुंबईत आल्याची माहिती शिवसैनिकांना समजताच त्यांनी त्यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने केली. जेव्हा प्रकरण वाढू लागले आणि तणावाची परिस्थिती निर्माण होऊ लागली. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. मात्र, पोलिसांनी त्यापूर्वी नोटीस देऊन राणा दाम्पत्याला तसे न करण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांनी पोलिसांकडे दुर्लक्ष केले होते. अखेर पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली होती.


हेही वाचा : राणा दाम्पत्याला जेलमध्ये दिलेली वागणूक गंभीर, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

First Published on: May 8, 2022 11:41 AM
Exit mobile version