राणा दाम्पत्याला जेलमध्ये दिलेली वागणूक गंभीर, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

Devendra Fadnavis targets Thackeray government over treatment of Navneet and ravi rana in jail
राणा दाम्पत्याला जेलमध्ये दिलेली वागणूक गंभीर, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना जेलमध्ये पोलिसांनी दिलेली वागणूक अतिशय गंभीर आहे. अशी वागणूक गुन्हेगाराला देण्यात येत नाही अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला होता. राणा दाम्पत्याने सामाजिक तेढ निर्माण केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असून नवनीत राणा लिलावती रुग्णालयात दाखल आहेत. फडणवीस यांनी राणा दम्पत्याला दिलेल्या वागणुकीवरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या सभेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राणा दाम्पत्याच्या जेलमधील वागणूकीवर फडणवीस म्हणाले की, नवनीत राणांची तब्येत आता सुधारत आहे. परंतु एकूणच ज्या प्रकारे त्यांना वागणूक देण्यात आली आहे. ती अतिशय गंभीर आहे. गुन्हेगार असतात त्यांना ज्या प्रकारची वागणूक देण्यात येत नाही. अशा प्रकारची वागणूक त्यांना देण्यात आली आहे. या सरकारने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलंडल्या असल्याचे वाटत आहे. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंच्या वक्तव्यार मोजकीच प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात 14 तारखेच्या सभेत विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. मी अनेक दिवसांनी माईकसमोर मास्क काढला आहे. तसा मास्क मी 14 तारखेला अनेकांचा काढणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला यावर फडणवसींनी चांगलं आहे उतरवलंच पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार नवनीत राणांना डिस्चार्ज मिळणार

खासदार नवनीत राणा यांना भायखळा जेलमधून सुटल्यानंतर लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्पॉन्डॅलिसिसच्या त्रासामुळे लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्ज मिळाल्यावर नवनीत राणा ठाकरे सरकारवर निशाणा साधण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : 14 तारखेला अनेकांचा मास्क काढणार उद्धव ठाकरेंचा भाजप, मनसेला इशारा