आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही, मलिकांचा पलटवार

आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही, मलिकांचा पलटवार

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत. वानखेडेंचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे. यावरुन नवाब मलिकांना भंगारवाला म्हणून संबोधण्यात येत आहे. सोशल मीडियावर लाल कपडे टाकून नवाब मलिक घाबरतील परंतु आम्ही कोणाच्याही बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. चोर लोक माझ्याकडे बोट दाखवत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधतान विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. नवाब मलिक म्हणाले की, या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहेत. सोशल मीडियावर लाल गाठोड दाखवत आहेत असे चोर लोक माझ्याकडे बोट दाखवत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी नाव न घेता केला आहे.

तसेच नवाब मलिक यांनी मी भंगारवाला असून माझ्याकडे सर्व कागदोपत्री असल्याचे म्हटलं आहे. मी भंगारवाला आहे. अशा रद्दी माझ्याकडे दहा -वीस आणि शंभर टन आहे. आम्ही चोर नाही आम्ही डाकू कडून सोनं घेतलं नाही. बँका बुडवल्या नाहीत. त्या वानखेडेशी कुणाचा काय संबंध आहे. कुठल्या हॉटेलचे कोण मालक आहे. त्या हॉटेलमधील वस्तू क्रुझवर कशा गेल्या. क्रुझवरील कॅटरिंग मध्ये ड्रग्ज कसे गेले. आता नावं घ्यायला सुरुवात केलेली आहे. इतकं का घाबरताय असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

वानखेडेंची जातप्रमाणपत्रावर चौकशी करा

समीर वानखेडे यांचे जाप्रमाणपत्र मुंबई शहरातील जिल्हा अधिकारी कार्यालयातून काढण्यात आलं आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारावर जातप्रमाणपत्र काढण्यात आलं आहे. मुंबई पोलीस ठाण्यात काही वकिलांनी तक्रारी दाखल केले आहे. प्रमाणपत्र वैध आहे की अवैध आहे हे ठरवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जात पडताळणी समिती विभागावर तयार केली आहे. जीएडीने एक सर्क्युलर काढले होते की, २०२१ पुर्वी ज्या लोकांनी शासकीय नोकरी घेतली आहे. ज्यांनी जातपडताळणी केली नाही त्यांना बंधनकारक आहे की जातपडताळणी करुन घ्यावी. केंद्र सरकारला तो नियम लागू नसताना तक्रार झाली की, जात प्रमाणपत्राची पडताळणी करणं ही त्यांची जबाबदारी आहे. सामाजिक न्याय विभागाकडे लोकं तक्रार करणार आहेत. जात पडताळणी समिती आहे. कोकण विभागाची तिकडे पडताळणी होणार आहे. बोगस प्रमाणपत्र आहे हे सिद्ध होणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : सातारा जिल्हा बँक निवडणूक : उदयनराजेंची जिरवण्यासाठी फिल्डिंग लावणाऱ्यांना राजे म्हणतात…


 

First Published on: October 30, 2021 6:55 PM
Exit mobile version