…मग बाकीच्यांनी कोणामुळे पक्ष सोडला? छगन भुजबळांचा सुहास कांदेंना सवाल

…मग बाकीच्यांनी कोणामुळे पक्ष सोडला? छगन भुजबळांचा सुहास कांदेंना सवाल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा झाली. या सभेनंतर शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतले हे कळेल’, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, छगन भुजबळांमुळे मी पक्ष सोडल्याचे सुहास कांदे यांनी सांगितले. सुहास कांदेंच्या या टीकेनंतर छगन भुजबळ यांनी सुहास कांदे यांना प्रत्युत्तर दिले. सुहास कांदे माझ्यामुळे पक्ष सोडला सांगताहेत तर, माझा काय सबंध आहे, यांनी माझ्यामुळे पक्ष सोडला, मग बाकीच्यांनी कोणामुळे सोडला? असा उलट प्रश्न छगन भुजबळांनी उपस्थित केला आहे.

नेमके काय म्हणाले छगन भुजबळ?

सुहास कांदे यांच्यावर चर्चा करणार नाही, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे आहेत. सुहास कांदे माझ्यामुळे पक्ष सोडल्याचे सांगतात, यात माझा काय सबंध आहे. कांदे यांनी माझ्यामुळे पक्ष सोडला, मग बाकीच्यांनी कोणामुळे सोडला? हे 40 लोक गेले, संपूर्ण देशाला माहिती आहेत”, असे छगन भुजबळ म्हणाले.

“महाविकास आघाडीच्या सभा होत आहेत, लोकशाही विरोधात काम चालू आहे. सत्तेतील लोकांना बाहेर काढावे, यासाठी सभा होणार असून निवडणूक जवळ येत आहेत, राहिलेले दीड वर्ष निघून जाईल, उद्या निवडणूक घ्या, आम्ही तयार आहोत, त्यांच्या मागे महाशक्ती असल्याने त्यांनी आव्हान स्वीकारले पाहिजे”, असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले.

सुहास कांदे काय म्हणाले होते?

“हिंदुत्वासाठी आम्ही सरकार बदललं. बाळासाहेबांना ज्यांनी शिव्या दिल्या. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून आज उद्धव ठाकरे बसले आहेत. मग आम्ही कोणाकडे पाहायचे? ज्यांच्या विरोधात आम्ही निवडणूक लढवली, आम्ही ज्यांना निवडणुकीत पराभूत केले. त्यांच्यासोबत बसायचे आणि ज्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली, त्यांच्या विरोधात बसायचे. हे उद्धव ठाकरे यांना कसे आवडले. हेच आम्हाला माहित नाही. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंना सोडून गेलो”, अशा शब्दांत सुहास कांदे यांनी छगन भुजबळांवर टीका केली होती.


हेही वाचा – नरेंद्र मोदी विश्वगौरव, युगपुरूष…; चंद्रशेखर बावनकुळेंकडून पंतप्रधानांवर स्तुतिसुमने

First Published on: March 27, 2023 3:49 PM
Exit mobile version