Raju Karemore Arrest : पोलिसांना शिवीगाळ करणं पडलं भारी, राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक

Raju Karemore Arrest : पोलिसांना शिवीगाळ करणं पडलं भारी, राष्ट्रवादीच्या आमदारांना अटक

भंडारा जिल्ह्यातील तुमरसचे आमदार राजू कारेमोरे यांना आज (सोमवार) पोलीसांनी अटक केली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मोहाडी ठाण्यात गोंधळ घालून अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मोहाडी पोलीस ठाण्यासमोर गर्दी जमली आहे. व्यापारी मित्रांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आणि ५० लाख चोरी केल्याचा आरोप कारेमोरे यांनी लावला होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरातून भंडारा पोलिसांनी अटक केली आहे. विविध कलमान्वये आज अटक करून त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आले आहे.

व्यापारी मित्रांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे आमदार राजू कारेमोरेंनी थेट पोलीस स्टेशन गाठले होते. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यात राडा घातला होता. त्यानंतर आमदारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्ट्रॉग रूमच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी गाडी चालकाला इंडिकेटर का दिले नाही? म्हणून गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली. गाडीतील यासीम छवारे आणि अविनाश पटले या दोन व्यक्तींना याबाबत विचारणा केली असता पोलीस आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. पटले आणि छवारे यांच्याजवळील ५० लाख रूपयांची रोख रक्कम आणि एक सोन्याची चेन पोलिसांनी पळवल्याची तक्रार फिर्यादी यासीम छवारे यांनी मोहाडी पोलिसात दिली आहे.

दरम्यान, कारेमोरे यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. भंडारा शहर पोलीस ठाण्यात अटकेची कारवाई करून त्यांना थेट मोहाडी येथील न्यायालयात नेण्यात आले. न्यायालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


हेही वाचा : sameer wankhede: समीर वानखेडेंची DRI मध्ये बदली, NCBमधील कार्यकाळ संपुष्टात


 

First Published on: January 3, 2022 3:59 PM
Exit mobile version