तलवारबाजीनंतर सुप्रिया ताई क्रिकेटच्या मैदानावर

तलवारबाजीनंतर सुप्रिया ताई क्रिकेटच्या मैदानावर

राजकीय मैदान गाजवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे क्रिकेटच्या मैदानावर अवतरल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे यांचा हडपसर येथील तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतल्याचा विडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. नेहमी राजकारणाचे मैदान गाजवत षटकार आणि चौकर मारणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे क्रिकेटच्या मैदानावर बॅटिंग करताना दिसल्या. पुण्यात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला क्रिकेट सामन्याचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांना बॅटिंग करण्याचा मोह आवरता आला नाही. उद्घाटनाच्यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी सोनल पटेल, कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेविका कमल व्यवहारे तसेच पदाधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात क्रिकेटचा सामना रंगला होता. या स्पर्धेत अशोक चव्हाण यांना पवारांचा एकही चेंडू टोलावता आला नव्हता. बॅटिंग करत असताना जोरदार फटके लगावत क्रिकेटचे मैदानही गाजवले अस म्हणता येईल.


तलवारबाजीचं घेतलं प्रशिक्षण

काही दिवसांपूर्वीच हडपसर येथे त्यांनी तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले होते. पुण्याच्या हडपसर परिसरातील एस एम जोशी कॉलेज आणि पवार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्तपणे एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देणे, हा त्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभागी होत, तलवारबाजी केल्याचं पाहायला मिळालं. एकूण दोन दिवस चाललेल्या या शिबिरामध्ये विद्यार्थीनींना कराटे तसंच खास शिवकालीन स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण दिलं गेलं.

First Published on: December 9, 2018 3:34 PM
Exit mobile version