Phone Tapping: ‘भाजप एजंट रश्मी शुक्ला फोन टॅप करायच्या हे उघड’

Phone Tapping: ‘भाजप एजंट रश्मी शुक्ला फोन टॅप करायच्या हे उघड’

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस दलातील बदल्या करण्यासंबंधित काही माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगितली. ही सगळी माहिती घेऊन ते दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहसचिवांची भेट घेणार आहेत. तसेच फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून व्हावी, अशी मागणी फडणवीस करणार आहेत. पण याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांनी चुकीची माहिती लोकांसमोर ठेवण्याचे काम केले असल्याचे ते म्हणाले. तसेच अधिकारी रश्मी शुक्ला यांचा खोटा आणि चुकीचा अहवाल फडणवीसांनी मांडला आहे. तसेच भाजप एजंट म्हणून काम केलेल्या रश्मी शुक्ला यांनी कोणतीही परवानगी न घेता फोन टॅप करत होत्या, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

पुढे नवाब मलिक म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला फोन टॅपिंगचा अहवाल माझ्याकडे आहे. दरम्यान कोणत्याही अधिकाऱ्याची बदली थेट मंत्री करत नाही. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केंद्रीय बोर्डाच्या निर्णयानंतरच होतात. त्यामुळे फडणवीस दिशाभूल करण्याचं काम करत आहेत.’

‘पोलीस बदल्याचा खोटा रिपोर्ट फडणवीस मुख्यमंत्री असताना देण्यात आला. त्याच्याच आधारे सरकारला आता बदनाम करण्याचे कटकारस्थान केले जात आहे. रश्मी शुक्लांनी परवानगी घेऊन फोन टॅपिंग केले, असे सांगितले जात आहे. पण हे खोटे असून त्यांनी कोणतीही परवानगी न घेता ३० लोकांचे फोन टॅप केले. हा एका गुन्हा आहे. महाराष्ट्रात जेव्हा सरकार निर्माण करण्याचे संकट होते, त्यावेळेस सर्व राजकारण्यांचे फोन टॅपिंग करण्याचे काम रश्मी शुक्ला करत होत्या. भाजपच्या एजंट नात्याने त्या काळात काम करत असताना त्यांना बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग करण्याची सवय झाली होती. फडणवीसांना ज्या अहवालाचा उल्लेख करत आहेत, त्यातून कोणतीही परवानगी न घेता फोन टॅपिंग सुरू होते हे उघड झाले आहे. अहवालामध्ये देण्यात आलेला ८० टक्के बदल्या झालेल्या नाहीत,’ असे नवाब मलिक यांनी सांगितले.


हेही वाचा – ठाकरे सरकारवर आता डेटा बॉम्ब; केंद्रीय गृहसचिवांना भेटून ‘त्या’ अहवालाच्या चौकशीची मागणी करणार – फडणवीस


 

First Published on: March 23, 2021 1:12 PM
Exit mobile version