राष्ट्रवादीच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन

राष्ट्रवादीच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन

राष्ट्रवादीच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन

राष्ट्रवादीच्या माजी आमदार आणि उल्हासनगरच्या आयर्न लेडी ज्योती कलानी यांच आज सायंकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे तात्काळ त्यांना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून त्या तीन वेळा आमदार झाल्या होत्या.

ज्योती कलानी या उल्हासनगरच्या आयर्न लेडी तसंच ‘भाभी’ म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्योती कलानी यांचा राजकीय प्रवास हा उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक पदापासून सुरु झाला. त्यानंतर त्या स्थायी समिती सभापती, महापौर आणि आमदार झाल्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, ज्योती कलानी यांनी उल्हासनगरमध्ये आपलं चांगलं राजकीय वर्चस्व निर्माण केलं होतं.

ज्योती कलानी या कुख्यात टाडा फेम माजी आमदार पप्पू कलानी यांच्या त्या पत्नी होत्या. पप्पू कलानी हे गेल्या १४ वर्षांपासून एका ह्तयेच्या गुन्ह्यात तुरुंगात आहेत. दरम्यान, त्यांचा मुलगा ओमी कलानी यांनी टीम ओमी कलानी अशी राजकीय संघटना तयार केली आहे. मात्र, ज्योती कलानी या राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून त्या आजमितीला राष्ट्रवादी सोबत होत्या. उल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा देखील त्या होत्या. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीची जी पोकळी निर्माण झालीय ती न भरून निघणारी आहे.

जयंत पाटलांनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ज्योती कलानी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उल्हासनगरच्या माजी शहराध्यक्षा तथा माजी आमदार ज्योतीताई कलानी यांचे दुःखद निधन झाल्याचे कळले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कलानी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना,” अशी पोस्ट जयंत पाटील यांनी केली आहे.

First Published on: April 18, 2021 9:35 PM
Exit mobile version