राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा आयोगाकडून फेरविचार; तृणमूल-भाकप-बसपलाही नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा आयोगाकडून फेरविचार; तृणमूल-भाकप-बसपलाही नोटीस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रीय दर्जा’चा निवडणूक आयोगाकडून फेरविचार करण्यात आला असून त्यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नोटीस पाठवली होती. या नोटीसीवर मंगळवारी (21 मार्च) आयोगासमोर पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यात आल्याचे समजते. तसेच राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनाही आयोगाकडून नोटीस पाठवल्याचे माध्यमात वृत्त आहे.

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पक्षांच्या दर्जाबाबत निवडणूक आयोगाकडून समीक्षा केली जाते. कारण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी नियमानुसार प्रत्येक पक्षाला काही अटींची पूर्तता करावी लागते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीसह तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाबाबत फेरविचार सुरू झाला होता. मात्र त्यावेळी निवडणूक आयोगाने आणखी एक लोकसभा निवडणूक होईपर्यंत सुनावणी पुढे ढकलली होती. २०१९च्या लोकसभा निवडणूक निकालांनंतर अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखा जवळ आल्यामुळे पुन्हा एकदा आयोगाने ही सुनावणी लांबणीवर टाकली होती. मात्र मंगळवारी (21 मार्च) निवडणूक आयोगाने या सर्व पक्षांना आपली बाजू मांडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे वकील सुनावणीला हजर असल्याचे समजते. या सुनावणीत राष्ट्रवादीकडून कोणती भूमिका मांडण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दर्जाचा फेरविचार करण्याची नोटसी पाठवल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

निवडणूक आयोजाचे राष्ट्रीय दर्जाचे निकष
चार राज्यांमध्ये ‘प्रादेशिक पक्ष’ म्हणून मान्यता असणे गरजेचे असून तीन राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत दोन टक्के जागांवर विजय आवश्यक असतो. याशिवाय लोकसभेमध्ये चार जागा किंवा सहा टक्के मत आणि विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा अधिक मत असणे गरजेचे असते. यापैकी कोणतीही एक अट पूर्ण करणाऱ्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय दर्जा दिला जातो.

राष्ट्रीय दर्जाचे काय फायदे
पक्षाला ‘राष्ट्रीय दर्जा’ असल्यास सर्व राज्यांमध्ये त्यांना एकच निवडणूक चिन्ह दिले जाते आणि नवी दिल्लीमध्ये कार्यालयासाठी जागा मिळते. याशिवाय निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रीय वाहिन्यांवर मोफत वेळही दिला जाता.

First Published on: March 23, 2023 8:05 PM
Exit mobile version