अहमदनगरमध्ये भाजपच्या सुजयशी राष्ट्रवादीचा ‘संग्राम’!

अहमदनगरमध्ये भाजपच्या सुजयशी राष्ट्रवादीचा ‘संग्राम’!

सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप

दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात मिठाचा खडा पडला होता. त्यातूनच सुजय विखेंना भाजपने आपल्या बाजूला खेचल्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी आता कोणता उमेदवार देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज, बुधवारी अखेर राष्ट्रवादीकडून अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देत असल्याचे जाहीर केले. विखे-पवार वादामुळे यावेळी नगरची जागा चांगलीच चर्चेत आहे. वय, शिक्षण, युवक आणि प्रसिद्धी असे मापदंड लावले तर सुजय विखे पाटील आणि संग्राम जगताप यांच्यातील लढत चुरशीची होणार, हे स्पष्ट आहे.

सुजय विखे यांच्या नाराजी नाट्यानंतर राष्ट्रवादीकडून मध्यतंरी संग्राम यांचे वडील आणि विधान परिषदेचे आमदार अरुणकाका जगताप यांचे नाव आघाडीवर होते. तर सुधाताई नागवडे आणि प्रशांत गडाख यांच्याही नावाची चर्चा होती. मात्र सुजय विखेंच्या प्रोफाईलला टक्कर देणारा उमेदवार देतानाच राष्ट्रवादीने नगरमधील अनेक गटांनाही जवळ करण्याची खेळी केली आहे. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावेळी मंचावर राहुरीचे भाजप आमदार शिवाजी कर्डिले महत्त्वाच्या स्थानी होते. संग्राम जगताप कर्डिले यांचे जावई आहेत. त्यामुळे कर्डिले कुणाची बाजू उचलून धरणार, पक्षाला की नात्याला? असा प्रश्न निर्माण झाला आहे. २००९ साली शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी अडीच लाखाच्या वर मते मिळवली होती.

संग्राम जगताप यांच्याबद्दल…

३३ वर्षीय संग्राम जगताप यांनी आतापर्यंत महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. अहमदनगर जिल्हा परिषद सदस्यापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक आणि महापौर पदही भुषवले होते. २०१४ साली पहिल्यांदा अहमदनगर शहरातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. महापौर असताना पक्षाच्या पलीकडे जाऊन शहरात विकासकामे केल्यामुळे संग्राम यांना नगर शहरात तरी सर्व मान्यता आहे.

मागच्या वर्षी अहमदनगर मनपात शिवसेनेचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी भाजपने जगताप यांच्याशी हातमिळवणी करुन मनपात भाजपचा महापौर बसवला होता. भाजपला केलेल्या मदतीमुळे राष्ट्रवादीवर चहुबाजूंनी टीका झाली होती. त्यानंतर जगताप आणि राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती.

केडगाव दुहेरी हत्याकांडात आले होते नाव

नगरच्या केडगाव येथे दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती. या प्रकरणात संग्राम जगताप आणि त्यांचे सासरे आमदार शिवाजी कर्डीले यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यांना या प्रकरणात तुरुंगातही जावे लागले. राष्ट्रवादी पक्ष जगताप यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला होता.

नगर मतदारसंघाचा सात-बारा

नगर लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा असून राष्ट्रवादीकडे दोन, भाजपकडे तीन आणि शिवसेनेकडे एक जागा आहे. अहमदनगर शहर मतदारसंघात स्वतः संग्राम आमदार आहेत. तर श्रीगोंदा येथे राष्ट्रवादीचे राहुल जगताप आमदार आहेत. शेवगावमध्ये भाजपच्या मोनिका राजळे आमदार असल्या तरी त्यांचा पुर्वाश्रमीचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. तसेच राहुरी मतदारसंघातील भाजप आमदार शिवाजी कर्डीले हे संग्राम जगताप यांचे सासरे आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून राष्ट्रवादीला मदत होऊ शकते. कर्जत-जामखेडचे प्रतिनिधीत्व जलसंवर्धन मंत्री राम शिंदे करतात. मात्र इथे शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये आपला संपर्क वाढवला आहे. पुढच्या विधानसभेला ते इथून निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा आहे.

उरलेल्या पारनेर मतदारसंघात शिवसेनेचे विजयराव औटी आमदार आहेत. मनपा महापौर निवडणुकीचा शिवसेनेने वचपा काढायचा ठरवल्यास इथून राष्ट्रवादीला फारशी मदत होणार नाही.

First Published on: March 20, 2019 9:28 PM
Exit mobile version