घाटी रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे बाळाचा दुर्देवी मृत्यू

घाटी रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे बाळाचा दुर्देवी मृत्यू

घाटी रुग्णालय औरंगाबाद

नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात घडली आहे. रुग्णालयात स्ट्रेचर नसल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला आहे. गर्भवती महिलेला चालत नेताना लिफ्टच्या दरवाज्यामध्येच तिची प्रसुती झाली. या प्रसुती दरम्यान, बाळ जमिनीवर पडून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनाली खटमोडे असे गर्भवती महिलेचे नाव आहे.

अशी घडली घटना

सोनाली बाळंतपणासाठी माहेरी आली होती. काल रात्री सोनालीला प्रसुती कळा सुरु झाल्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात स्ट्रेचर नसल्यामुळे सोनालीला लिफ्टपर्यंत चालवत नेण्यात आले. त्या दरम्यान, सोनालीची लिफ्टच्या दरवाजामध्येच प्रसुती झाली. प्रसुतीवेळी त्यांचे बाळ जमिनीवर पडले त्यामुळे बाळाचा जागीच मृत्यू झाला.

दोषींवर कारवाई होणार

घाटी रुग्णालय प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ही घटना दुर्देवी असून या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर करावाई करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. तर, राज्यमंत्री दिपक केसर यांनी देखील या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे सांगितले आहे. हा विभाग माझा नाही. पण, घटना गंभीर असून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर बाळ परत येऊ शकणार नाही. पण, कुटुंबाच्या मागे आम्ही आहोत आणि दोषींना शिक्षा देऊ, असे केसरकरांनी सांगितले.

First Published on: January 23, 2019 1:08 PM
Exit mobile version