नितेश राणेंकडून ठाकरेंचा तो व्हिडीओ ट्वीट; मात्र, नेमकी सत्यता काय?

नितेश राणेंकडून ठाकरेंचा तो व्हिडीओ ट्वीट; मात्र, नेमकी सत्यता काय?

Nitesh Rane Tweet Against Uddhav Thackeray | मुंबई – ‘औरंगजेब माझा भाऊ होता,’ असं वक्तव्य असलेला उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडीओ भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्वीट केला आहे. औरंगजेबाला आपला भाऊ मानणाऱ्या नेत्याला राणेंनी सर्वांत मोठा गद्दार संबोधलं आहे. परंतु, उद्धव ठाकरे ज्या औरंगजेबाला आपला भाऊ म्हणत आहेत तो इतिहासातला औरंगजेब नसून लष्करातील औरंगजेब आहे, असं नेटिझन्सने राणेंना सुनावले आहे.

हेही वाचा – यावरून हेच सिद्ध होते;, उद्धव ठाकरे-केजरीवाल भेटीवरून नितेश राणेंची टीका

‘औरंगजेब माझा भाऊ होता. त्याने भारतासाठी आपले प्राण गमावले. तो धर्माने मुसलमान असेलही. पण त्याने आपल्या देशासाठी प्राण दिले. मग तो आपला भाऊ नाही झाला का?’, असं उद्धव ठाकरे या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. हा व्हिडीओ आज भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्वीट करून सर्वांत मोठा गद्दार असं कॅप्शन दिलं आहे.

परंतु, या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे ज्या औरंगजेबाबाबत बोलत आहेत तो औरंगजेब इतिहासातील नसून भारतीय सीमेचं रक्षण करताना शहीद झालेला जवान औरंगजेब आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यावर नेटिझन्सने संताप व्यक्त केला आहे.


कोण औरंगजेब?

१४ जून २०१८ मध्ये औरंगजेब नावाचे भारतीय लष्करातील जवान पुलवामाच्या कालम्पोरा येथे शहीद झाले होते. १४ जून रोजी ते राजौरी येथे ईद साजरी करण्याकरता आपल्या गावी जात होते. तेव्हा काही दहशतवाद्यांनी त्यांचं अपहरण केलं. सायंकाळी पोलिसांना कालम्पोरापासून १० किमी अंतरावर असलेल्या गुस्सू गावात त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळला होता. ३० एप्रिल २०१८ रोजी मेजर रोहित शुक्ला यांच्या समूहातून औरंगजेब यांनी एक मोठं दहशतवाद्यांविरोधातील ऑपरेशन यशस्वी पार पाडलं होतं. यामुळेच दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली असल्याचं म्हटलं गेलं.

अशा जिगरबाज, देशाची प्राणांची आहुती दिलेल्या औरंगजेबाला उद्धव ठाकरेंनी आपला भाऊ असं संबोधलं. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करत नितेश राणेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

First Published on: February 28, 2023 10:17 AM
Exit mobile version