शिवाजी महाराजांचा पुतळा आंदोलनस्थळ नाही; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा आमदार नितीन देशमुखांना कारवाईचा इशारा

शिवाजी महाराजांचा पुतळा आंदोलनस्थळ नाही; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा आमदार नितीन देशमुखांना कारवाईचा इशारा

मुंबईः विधान भवनातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन न करण्याची समज आमदार नितीन देशमुख यांना दिली जाईल. त्यांनी ऐकले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंग अथवा अन्य योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी दिला.

पाणी योजनेला स्थगिती दिल्याने आमदार नितीन देशमुख यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बसून आंदोलन सुरु केले. हा मुद्दा मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत मांडला. आमदार नितीन देशमुख यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरु केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार मी नितीन देशमुख यांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केली. ही स्थगिती तत्काळ उठवणे शक्य नाही, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर थोड्या वेळासाठी ते विधानसभेच्या पायऱ्यांवर आले. मग पुन्हा ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गेले, असे शंभुराज देसाई यांनी सभागृहात सांगितले.

शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्याची आपली परंपरा नाही. आम्ही सन २००४ पासून सभागृहात येत आहोत. अनेक ज्येष्ठ सदस्य येथे आहेत. आंदोलन विधान भवनाच्या पायऱ्यांवर केले जाते. अशा प्रकारे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करणे योग्य नाही. त्यामुळे आमदार नितीन देशमुख यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शंभुराज देसाई यांनी केली.

या मागणीला आमदार अशोक चव्हाण यांनी विरोध केला. याप्रकरणात कारवाईची आवश्यकता नाही. नितीन देखमुख यांची मागणी काय आहे ते समजून घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी, असे आमदार अशोक चव्हाण सांगितले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मंत्री शंभुराज देसाई यांच्या मागणीला विरोध केला.

मात्र विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी नितीन देशमुख यांच्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली. मीही नितीन देखमुख यांना माझ्या दालनात चर्चेसाठी बोलावले होते. पण ते आले नाहीत. हे योग्य नाही. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करु नका, अशी समज मी त्यांना पुन्हा देईन. जर ते ऐकले नाहीत तर त्यांच्यावर शिस्तभंगाची अथवा अन्य कारवाईचा विचार नक्कीच केला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

First Published on: March 14, 2023 5:52 PM
Exit mobile version