आम्ही स्वबळावरच लढणार – संजय राऊत

आम्ही स्वबळावरच लढणार – संजय राऊत

उद्धव ठाकरे- अमित शहा भेट ( फोटो सौजन्य - सामना )

शिवसेना – भाजप युतीसाठी अमित शहांची ‘शिष्टाई’ कामी येणार नाही यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे असेच म्हणावे लागेल. कारण, “आम्ही स्वबळावरच लढणार” असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे ‘मातोश्री’वरची उद्धव ठाकरे – अमित शहा बैठक ‘निष्फळ’ ठरली असेच म्हणावे लागेल. संजय राऊत यांनी जरी स्वबळाचा पुनरूच्चार केला असला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अमित शहांची शिष्टाई निष्फळ?

नाराज शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची मनधरणी केली. पण, अमित शहांची ‘शिष्टाई फळाला’ आली नाही असेच म्हणावे लागेल. कारण शिवसेनेने स्वबळाचा पुनरूच्चार केला आहे. मातोश्रीवरच्या दुसऱ्या मजल्यावरच्या बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये दोन तासाहून अधिक काळ चर्चा झाली. यावेळी शिवसेनेने आगामी लोकसभा आणि विभानसभा निवडणुका एकत्र लढाव्यात यासाठी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. दोन तासाहून अधिक चाललेल्या चर्चेत नेमके बोलणे झाले? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

“राज्यात तुम्हीच मोठे भाऊ!”

जुना मित्रपक्ष असलेला शिवसेना प्रचंड नाराज आहे. याची पूर्ण कल्पना असल्याने अमित शहा यांनी शिवसेनेच्या नाराजीवर राम’बाण’ उपाय दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. अमित शहांनी उद्धव ठाकरेंसमोर राज्यात तुम्हीच मोठे भाऊ असल्याचा प्रस्ताव ठेवला. तसेच २०१९ साली मुख्यमंत्रीपदाची पहिली टर्म ही शिवसेनेची असेल असा प्रस्ताव देखील अमित शहांनी उद्धव ठाकरेंसमोर ठेवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

“युती नाहीच”

भाजपने कितीही मनधरणी केली तरी शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यामुळे युती नाहीच असा पुनरूच्चार संजय राऊत यांनी केला आहे. “अमित शहांच्या अजेंड्याविषयी आम्हाला माहिती आहे. स्वबळाच्या निर्णयावर कोणताही बदल होणार नाही” असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच “एका पक्षाचा ठराव दुसरा पक्ष बदलू शकत नाही” असा टोलाही राऊत यांनी भाजपला हाणला. दरम्यान, या राजकीय घडामोडीवर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही

First Published on: June 7, 2018 10:48 AM
Exit mobile version