भाजपसाठी मी पप्पू असेन; पण माझ्या मनात द्वेष नाही

भाजपसाठी मी पप्पू असेन; पण माझ्या मनात द्वेष नाही
“भाजपसाठी मी पप्पू असेन पण माझ्या मनात द्वेष नाही”, असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळभेट घेतली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केंद्र सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर चर्चा सुरू आहे. यावेळी भाषणाच्या शेवटी राहुल गांधी यांनी भाजपसाठी मी पप्पू असेन पण माझ्या मनात द्वेष नाही असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. अविश्वास ठरावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. तसेच राफेल विमान खरेदीवरून केलेल्या आरोपावरून लोकसभेत मोठा गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी ५ मिनिटांसाठी तहकूब केले. यानंतर महाजन यांनी सर्वांना शांततेने चर्चेचे आवाहन केले

राहुल गांधी यांचे गंभीर आरोप

संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अविश्वास ठरावावरून लोकसभेत वादळी चर्चा सुरू आहे. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकार हे जुमल्यांचे सरकार असल्याचा आरोप भाषणाच्या सुरूवातीला केला. पण मोदींनी कोणतेही वचन पाळले नाही. देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर १५ लाख रूपये येणार होते, ते कुठे आहेत? असा सवाल राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना केला. तर तरूणांना रोजगार देण्यामध्ये देखील सरकार अपयशी ठरल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनामध्ये गरीब आणि मागासवर्गीय लोकांसाठी थोडीही जागा उरलेली नाही. तसेच नोटबंदी हा नरेंद्र मोदी यांनी केलेला सर्वात मोठा विनोद असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी काही उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी यावेळी केला. दरम्यान राफेल विमान खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला. संरक्षणमंत्री खोटे बोलत असून ५२० कोटींचे विमान १६०० कोटींना खरेदी केल्याचा गंभीर राहुल गांधी यांनी केला.
यावरू सभागृहात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच पतंप्रधान नरेंद्र मोदी हे चौकीदार नसून भागिदार असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. डोकलाम प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनभेटी वेळी बोटचेपी भूमिका घेत जवानांची फसवणूक केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तर देशात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत असून पंतप्रधान मोदी काहीच करत नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मात्र भाषणाच्या शेवटी भाजपसाठी मी पप्पू असेन पण माझ्या मनात द्वेष नाही असे म्हणत काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळभेट घेतली. यावरून लोकसभेतील वातावरण थोडंफार का असेना हलकं होण्यासाठी मदत झाली. पण चर्चा मात्र एकाच गोष्टीची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या कानात काय सांगितले?
First Published on: July 20, 2018 4:07 PM
Exit mobile version