अण्णांच्या मनधरणीसाठी केंद्राकडून हालचाली

अण्णांच्या मनधरणीसाठी केंद्राकडून हालचाली

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवरून आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर भाजप पक्ष सावध आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी फडणवीस सरकारच्या काळात संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी महाजन यांनी अण्णा हजारे यांच्या मनधरणीचा प्रयत्न केल्याचे समजते.

कृषी कायद्यांविरोधात सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत आणि कायदे मागे घेण्याबाबत अण्णा हजारे यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. केवळ कृषी कायदे मागे घेऊन शेतकर्‍यांचे प्रश्न सुटतीलच असे नसून, दिल्लीतील आंदोलन हे सिमीत आहे असे मत त्यांनी नुकतेच व्यक्त केले होते. अण्णा हजारेंनी आंदोलन छेडल्यास भाजपची कोंडी होऊ शकते, याकरीता आता अण्णांच्या मनधरणीसाठी केंद्राकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. याचाच भाग म्हणून गुरुवारी भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारेंची भेट घेत त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. महाजन यांनी तब्बल दीड तास त्यांच्याशी चर्चा केली.

यापूर्वी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनीदेखील अण्णांची भेट घेऊन मनधरणी केली होती. अण्णांनी आंदोलन करू नये, अशी विनंती महाजन यांनी केली. यापूर्वीही महाजन यांनी ३० जानेवारी २०१९ रोजी अण्णांनी केलेले उपोषण सोडविण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अण्णांची भेट घेतली होती.

अण्णांची भेट घेत त्यांनी आंदोलन न करण्याची विनंती आपण त्यांना केली आहे. गरज पडली तर, देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करू.
– गिरीश महाजन, माजी मंत्री भाजप

First Published on: December 24, 2020 11:59 PM
Exit mobile version