वादळी वाऱ्यामुळे जळगावसह नंदुरबारमधील पिकांना तडाखा

वादळी वाऱ्यामुळे जळगावसह नंदुरबारमधील पिकांना तडाखा

जळगाव : राज्यभरात शनिवार आणि रविवारी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. अशा बदलत्या वातावरणामुळे पिकांवर संक्रांत आली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला असून, त्यांना सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यात अंमळनेर, पाचोरा तालुक्यात काही गावात झालेल्या वादळी वार्‍याने रब्बी हंगामातील गहू, ज्वारी आणि मका या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या संकटांची मालिका काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यातच खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगाम वाया गेला होता. त्यानंतर रब्बी हंगामावर शेतकर्‍यांची भिस्त असताना दोन दिवसांत पुन्हा एकदा वादळी वार्‍याने अमळनेर आणि पाचोरा तालुक्यात काही गावांना तडाखा बसला आहे. वादळी वारा आणि पाऊसामुळे या भागातील शेतकर्‍यांचे रब्बी हंगामातील पिके जमीनदोस्त झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांच्या या नुकसानीचे शासनाने त्वरित पंचनामे करावे आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

तापमान ७ अंशांवर

राज्यातल्या अनेक भागातील कमाल तापमानात मोठी घसरण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तापमानात पारा पुन्हा घसरला आहे. सपाटी भागात तापमान 7 ते 8 अंश डिग्री सेल्सिअस पर्यत घसरले. आज सातपुडा पर्वत रागांमधील डाब भागात पुन्हा दवबिंदु गोठले आहेत. यामुळे गवतांवर बर्फाच्छादीत चादर पसरल्याचं चित्र दिसून आले.

नंदुरबारला मिरची भिजली; मजुरांची तारांबळ

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अंदाजे अर्धातास पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा मिरचीच्या पिकाला बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिरचीचे उत्पादन होते. व्यापारी व शेतकर्‍यांनी आपली मिरची सुकवण्यासाठी मोकळ्या मैदानात टाकली होती. मात्र, अचानक पाऊस आल्याने त्यात ती भिजली. तसेच, मजुरांचीदेखील तारांबळ उडाली.

मैदानांमध्ये वाळण्यासाठी टाकलेली मिरचीदेखील भिजली आहे. नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने काही प्रमाणात थंडी कमी झाली होती. मात्र, पावसाच्या सरींमुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, गारठा वाढला आहे. किमान तापमानातही घट झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून, बळीराजा संकटात सापडला आहे. या नुकसानाचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

First Published on: January 25, 2022 9:17 AM
Exit mobile version