उद्या सकाळपर्यंत अटक करू नका, ठाणे न्यायालयाचा आव्हाडांना दिलासा

उद्या सकाळपर्यंत अटक करू नका, ठाणे न्यायालयाचा आव्हाडांना दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपच्या पदाधिकारी महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी आता ठाणे न्यायालयाने जितेंद्र आव्हाडांना दिलासा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत अटक न करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहे. (Not To Arrest Jitendra Awhad Till 11 Am Tomorrow Orders Of Thane Court)

आमदार जितेंद्र आव्हाडांना मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत अटक न करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने मुंब्रा पोलिसांना दिले आहेत. मंगळवारी या प्रकरणात ठाणे न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीपर्यंत जितेंद्र आव्हाडांना अटक करु नये असे आदेश न्यायलयाने दिले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या कार्यक्रमात एका महिलेला धक्का देऊन दूर केल्यामुळे ठाण्यातील मुंब्रा पोलिस स्टेशनमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

या गुन्ह्याबाबत आज जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी आव्हाडांना राजीनामा देऊ नये अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आव्हाड राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहिले. एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता, पण विनयभंगाचा मान्य नाही म्हणत पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड काहीसे भावूक झाल्याचे दिसले.

“माझ्यावर एकवेळ खुनाचा गुन्हा दाखल झाला तर चालला असता, पण विनयभंगाचा गुन्हा मान्य नाही. अशा आरोपांमुळे समाजात माझी मान खाली जात आहे. महाराष्ट्रात अतिशय खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे. त्यामुळे राजकारणात न राहिलेलं बरं आहे. एफआयआरमध्येही माझ्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मला मान्य नाही, हा गुन्हा माझ्या विरोधातील षडयंत्रणाचा भाग आहे”, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.


हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृत्याबद्दल सुप्रिया सुळे गप्प का, रिदा रशीद यांचा सवाल

First Published on: November 14, 2022 7:58 PM
Exit mobile version