‘त्या’ जमिनीच्या तपासासाठी अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार

‘त्या’ जमिनीच्या तपासासाठी अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल, एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार

Eknath Khadase | मुक्ताईनगर – महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रकरणे बाहेर काढून त्यांच्यावर कारवाई होत असताना आता आणखी एक प्रकरण बाहेर आलं आहे. यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांच्यावर ४०० कोटींचा आरोप विधिमंडळात करण्यात आला होता. या आरोपांची दखल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली असून महसूल विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. महसूल विभागाचे अधिकारी मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले असून एकनाथ खडसेही सापळ्यात अडकतात का याकडे राजकीय विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा सावरकर-गोळवलकर चुकले म्हणून माफी मागणार का?; डॉ. जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला

यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन विविध आरोपांनी गाजले. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. एकमेकांचे घोटाळे बाहेर काढले गेले. यामध्ये राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावरही ४०० कोटी घोटाळ्यांचा आरोप करण्यात आला. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी ३३ हेक्टर ४१ आर जमिनीवर उत्खनन करून ४०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. हा आरोप एकनाथ खडसे यांनी फेटाळून लावला होता. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याकरता एसआयटी नेमण्याची मागणी करण्यात आली होती.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपाची गंभीर दखल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. त्यानुसार, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज थेट मुक्ताईनगर गाठलं आहे. आता महसूल विभाग काय कारवाई करतं, याकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

हेही वाचा – धारावी पुनर्विकासातून नेचर पार्क वगळले; राज्य शासनाची हायकोर्टात माहिती

नेमकं प्रकरण काय?

मंदाकिनी खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात ३३ हेक्टर ४१ आर जमीन खरेदी करण्यात आली होती. ही जमीन शालेय कारणासाठी घेण्यात आली होती. त्यामुळे या जमिनीला बिनशेती परवाना म्हणजे एनए परवाना मिळाला होता. मात्र, ही जमीन कृषक जमीन दाखवण्याकरता २०१९ मध्ये अर्ज करण्यात आला. काही दिवसांनी प्रांताधिकाऱ्यांनी या जमिनीला शेतीसाठी तत्काळ परवानगी दिली. या जमिनीवरून अवैध गौणखनिज उत्खनन करण्यात आले. या उत्खनानातून तब्बल ४०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याच आरोप, चंद्रकांत पाटलांनी केला होता.

First Published on: January 2, 2023 7:36 PM
Exit mobile version