शरद पवारांचा एक फोन आणि सोनिया गांधींचे घुमजाव

शरद पवारांचा एक फोन आणि सोनिया गांधींचे घुमजाव

शरद पवार आणि सोनिया गांधी

भाजपनंतर शिवसेना आणि आता राष्ट्रवादीला राज्यपालांकडून सत्ता स्थापनेचे आमंत्रण देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणं झपाट्याने बदलतं आहेत. त्यातच मास्टर स्ट्रोक मारला तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी. शरद पवार यांचा एक फोन कॉल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना गेला आणि शिवसेना-महाआघाडीचे सरकार बनता बनता राहिले. काल, सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत शिवसेनेला सत्ता स्थापनेवर दावा करण्याची मुदत राज्यपालांनी दिली होती. त्याकरता मुंबईतून शिवसेनेचे शिष्टमंडळ काल दिल्लीला गेले होते. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि अनिल देसाई यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे यांची भेटही घेतली. त्यावेळी काँग्रेसच्या वतीने आमची शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी आहे, मात्र राज्यातील आमदारांशी बोलावं लागेल, असे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि रात्री उशीर काँग्रेसचे पत्र प्रसिद्ध झाले. त्यातही सेनेला पाठिंब्याचा उल्लेख केलेला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, काल शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना फोन करून सांगितले की, इतक्यात शिवसेनेला पाठिंबा देण्याची गरज नाही. दोन दिवस थांबा. आपलेच सरकार येईल. त्यानंतर सोनिया गांधी यांनी वेळकाढूपणा करत रात्री उशिरा पत्र पाठवले. मात्र त्यात शिवसेनेला पाठिंबा देण्याचा कोणताही उल्लेख केला नाही.

पवारांनी सांगितल्याने भेट रद्द – ठाकरे 

काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि के. सी. वेणुगोपाल यांची मुंबईतील भेट रद्द झाली असून शरद पवारा यांनी सांगितल्यामुळेच ही भेट रद्द झाल्याचे काँग्रेसचे नेता माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठका होणार आहेत. या बैठकींनंतर काँग्रेसचे तीन बडे नेते पवारांच्या भेटीला येणार होते. मात्र आता ही भेटच रद्द झाली आहे. त्यामुळे पवारांच्या भूमिकेमुळे काँग्रेसचा निर्णयही लांबणीवर जात असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा –

थेट रुग्णालयातून राऊत यांचे ट्विट; ‘हम होंगे कामयाब’

First Published on: November 12, 2019 9:53 AM
Exit mobile version