वाद निर्माण झाल्यानंतर ‘मनूस्मृति’चे प्रश्न मुक्त विद्यापीठाने वगळले

वाद निर्माण झाल्यानंतर ‘मनूस्मृति’चे प्रश्न मुक्त विद्यापीठाने वगळले

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बी.ए. (राज्यशास्त्र) तृतीय वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन आक्षेपार्ह प्रश्नांबाबत विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे. वादग्रस्त ठरलेले दोन्ही प्रश्न बाद ठरवत अभ्यासक्रमातील संबंधित आक्षेपार्ह घटकच रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पेपर सेट करणार्‍या व्यक्तींसह समीक्षक (मॉडरेटर) यांची चौकशी करण्यात येऊन दोषींना शिक्षा करण्याचे आदेश प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. प्रकाश देशमुख यांनी दिले.

मुक्त विद्यापीठाच्या बी. ए. (राज्यशास्त्र) तृतीय वर्षाच्या प्रश्नपत्रिकेत ‘आधुनिक भारतातील राजकीय वारसा’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा’ आणि ‘मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्व स्पष्ट करा’ हे दोन प्रश्न विचारले होते. यावर काही सामाजिक संघटनांनी आक्षेप घेऊन निवेदन दिले. कुलसचिव प्रा. डॉ. देशमुख यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची त्वरित बैठक बोलावून याबाबत चर्चा केली. दोन्ही आक्षेपार्ह प्रश्न बाद ठरविण्यात येऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य मूल्यमापन करण्यात येईल, असे ठरवले. प्रामुख्याने या अभ्यासक्रमातील याबाबतचा आक्षेपार्ह घटक अभ्यासक्रमातून रद्दबातल ठरविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सुधारित पुस्तके संबंधित विषयाच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षात उपलब्ध करून दिली जातील. सध्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेला हा आक्षेपार्ह घटक त्वरित काढून घेण्याचाही निर्णय घेण्यात आला.

संबंधित आक्षेपार्ह प्रश्नपत्रिका तयार करणारे पेपर सेंटर, संपादक, मॉडरेटर यांची माहिती घेऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीला परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील, नियोजन अधिकारी डॉ. हेमंत राजगुरू, कुलसचिव प्रा. डॉ. देशमुख यांच्यासह मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे संचालक डॉ. प्रवीण घोडेस्वार, मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. सज्जन थूल उपस्थित होते.

 

जाहीर माफी मागावी : अंनिस

मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात मनुस्मृती संदर्भात केलेले विवेचन घटनाविरोधी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सातत्याने चुकीचा इतिहास सांगून बदनामी केली जात आहे. या दोन्ही घटनांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तीव्र निषेध करते. प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत मुक्त विद्यापीठाने माफी मागावी, अशी मागणी अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, डॉ. सुदेश घोडेराव, कृष्णा चांदगुडे, राजेंद्र फेगडे, अ‍ॅड. समीर शिंदे, नितीन बागूल, प्रल्हाद मिस्त्री, महेंद्र दातरंगे यांनी केली आहे.

राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा : छात्रभारती

समाजात धार्मिक तेढ आणि विषमतेचे समर्थन करणार्‍या मनुस्मृती ग्रंथाचा अभ्यासक्रमात समावेश करणार्‍या मुक्त विद्यापीठावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडे केली आहे. भारतीय संविधानविरोधी मनुस्मृती व छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिणार्‍या मुक्त विद्यापीठाची अभ्यास मंडळ समिती तसेच कुलगुरू, कुलसचिव यांच्यावर राज्य घटनेच्या कलम १४, १५ आणि आयपीसी कलम १२४ प्रमाणे राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी छात्रभारतीने निवेदनाद्वारे केली आहे.

अभ्यासक्रमाची होळी : एआयएसएफ

मुक्त विद्यापीठाच्या निषेधार्थ एआयएसएफने कुलगुरू कार्यालयाबाहेर, प्रशासकीय इमारत येथे अभ्यासक्रमाची होळी केली. यावेळी ’फेक दो, फेक दो, मनुस्मृती को फेक दो’, ’छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास लिहिणार्‍या मुक्त विद्यापीठाचा धिक्कार’ असो अशा घोषणा दिल्या. फेडरेशनचे राज्याध्यक्ष विराज देवांग, राज्य सहसचिव भीमा पाटील,एआयएसएफचे राज्य कौन्सिल सदस्य तल्हा शेख, शहराध्यक्ष जयंत विजयपुष्प, प्राजक्ता कापडणे, कैवल्य चंद्रात्रे, कैफ शेख, प्रज्ञा साळवे, दीक्षा साळवे उपस्थित होते.

First Published on: July 15, 2022 1:13 PM
Exit mobile version