यापुढे सभागृहात एकही कायदा विनाचर्चा होणार नाही – अजित पवार

यापुढे सभागृहात एकही कायदा विनाचर्चा होणार नाही – अजित पवार

यापुढे सभागृहात एकही कायदा विनाचर्चा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागणार असून यापुढे एकही कायदा विनाचर्चा मंजूर होणार नाही, असा शब्द विरोधी पक्षनेता म्हणून नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी दिला. आज महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर अजितदादा पवार यांनी सभागृहात आपले मनोगत व्यक्त केले. लोकशाहीत अध्यक्ष, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही पदे जशी महत्त्वाची असतात, तसेच विरोधी पक्षनेतेपद देखील महत्त्वाचे असते अशी भावनाही अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.

विधिमंडळात आपण नियम आणि आयुधांचा व्यवस्थित वापर केला तर जनतेचे प्रश्न सोडवता येतात. विधिमंडळाची जशी गौरवशाली परंपरा आहे तशी विरोधी पक्षनेत्यांची देखील परंपरा आहे. मी माझ्या कार्यकाळात अतिशय चांगले विरोधी पक्षनेते पाहिले आहेत. मी अनेक वर्षे सत्ताधारी पक्षात काम केले आहे. १९९५ ते १९९९ साली विरोधात काम केले. तेव्हापासून अनेक सरकारे जवळून पाहिली. विरोधी पक्षनेत्यांची ताकद काय असते, हे अनेक दिग्गजांनी विधिमंडळात दाखवून दिले आहे. जनतेला सरकारच्या प्रतिनिधींकडून न्याय मिळाला नाही तर लोक विरोधी पक्षनेत्याकडे येतात. सत्तेत नसतानाही विरोधी पक्ष नेता जनतेला कसा न्याय देऊ शकतो, हे माझ्याआधी अनेक विरोधी पक्ष नेत्यांनी दाखवले आहे. सत्तेच्या विरोधात राळ उठवून सरकारला देखील अडचणीत आणणारे विरोधी पक्षनेते आपण पाहिले आहेत असेही अजितदादा पवार म्हणाले.

या सभागृहाचा विरोधी पक्षनेता म्हणून जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्याचे काम आम्ही करु असे सांगतानाच महाविकास आघाडी सरकार २०१९ साली आल्यानंतर लगेचच कोरोनाचे संकट आले. त्यामुळे अधिवेशने एक-दोन दिवसांची झाली. नागपूर अधिवेशनदेखील झालेले नाही. आता यापुढे अधिक दिवस अधिवेशन चालेल याची काळजी सरकारने घ्यावी असेही अजितदादा पवार म्हणाले.

या सभागृहाने अनेक क्रांतिकारी कायदे केलेले आहेत. यापुढे असेच कायदे व्हावेत, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या कामाचा दर्जा, चर्चेचा स्तर उंचावण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे, तशी ती विरोधी पक्षाची देखील आहे, हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. जनतेमध्ये गेल्यावर आपल्याला मान खाली घालावी लागणार नाही, याची काळजी आपण सर्वजण मिळून घेऊ असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

विधिमंडळाच्या कामकाजात न्यायालयाचा हस्तक्षेप येऊ नये यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण कायदेमंडळ आहोत, आपण आपले काम केले पाहिजे. उपमुख्यमंत्री चांगले वकील आहेत ते याची काळजी नक्की घेतील अशी अपेक्षाही अजितदादा पवार यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेत्याने कमी बोलावे आणि सहकारी आमदारांना अधिक संधी द्यावी, याची काळजी मी माझ्या विरोधी पक्षनेतेपदाच्या कार्यकाळात घेईन. मी सत्तेत असलो काय किंवा विरोधी पक्षात असलो काय, मी सकाळपासून कार्यरत असतो हे सर्वजण जाणतात. त्याच जबाबदारीने मी विरोधी पक्षनेतेपदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन, अशी हमीही अजितदादा पवार यांनी दिली.


हेही वाचा : व्हिपचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात याचिका दाखल करता येऊ शकते – देवेंद्र


 

First Published on: July 4, 2022 7:09 PM
Exit mobile version