खारघर दुर्घटनेप्रकरणी न्यायालयात जाणार; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

खारघर दुर्घटनेप्रकरणी न्यायालयात जाणार; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

Ambadas Danve

नवी मुंबई – खारघर दुर्घटनेप्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी करावी अशा मागणीचे निवेदन आज नवी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले. जर पोलिसांनी येत्या १४ दिवसात आम्ही दिलेल्या निवेदनावर योग्य कारवाई न केल्यास न्यायालयात जाऊन मृत श्री सेवकांना न्याय देणार, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाची चौकशी करून आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने आज नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतली, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

सदर कार्यक्रमाच्या आयोजकांनी आपण दिलेल्या परवानगीचे काटेकोर पालन केले का?, केले नसल्यास आपण काय कार्यवाही केली?, आपण सदर घटनेसंदर्भात आतापर्यंत किमान अपमृत्युचा गुन्हा दाखल करून चौकशी केली का?, सदर घटने संदर्भात क्षेत्राचे पोलीस उपआयुक्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कर्तव्यात कसूर केली असून, त्यांच्यावर कारवाई का केली नाही? आदी प्रश्न त्या घटनेच्या तपासावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांना विचारले.

यावेळी शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार राजन विचारे , संपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, उपजिल्हाप्रमुख संदीप पाटील, शहर प्रमुख विजय माने, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, नगरसेवक काशिनाथ पवार, नगरसेवक मनोज हळदणकर, जिल्हा उपसंघटक (महिला) उषा रेनके, इतर पदाधिकारी उपस्थित होते.

तर, आज (ता. 24 एप्रिल) याच प्रकरणी दोषी पोलिसांवर कारवाई करण्यात यावी आणि या घटनेची चौकशी करण्यात यावी, यासाठी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अंबादास दानवे यांनी सांगितले की, “खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र या घटनेसंदर्भात सरकारने कोणतीही भूमिका, प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. याप्रकरणी न्याय मागण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या आमदारांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली”

हेही वाचा – कुंदन संखे शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख, राजेश शहा यांची उपनेते पदी वर्णी

“एवढी मोठी घटना घडल्यानंतर आकड्याबाबत संभ्रम आजही कायम आहे. खरोखर किती लोक गेले, यात किती मृत्यू झाले याची पोलीस ठाण्यात नोंद आहे की नाही किमान अपमृत्यू म्हणून तरी नोंद आहे की नाही हे आम्ही राज्यपालांना विचारलं आहे. सदोष मनुष्यवध हा गुन्हा नंतर दाखल होईल, मात्र पहिले पोलिसांनी अपमृत्यूची नोंद दाखल करण्याची आवश्यकता असते. 100 जणांचा कार्यक्रम घेताना देखील पोलीस नियम सांगतात, निमय मोडले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असं सांगतात”,असेही अंबादास दानवे यांच्याकडून सांगण्यात आले.

First Published on: April 24, 2023 9:52 PM
Exit mobile version