‘ठाण्याच्या कचऱ्यावर पोसली जातेय शिवसेना!’

‘ठाण्याच्या कचऱ्यावर पोसली जातेय शिवसेना!’

एका शासन निर्णयाने महापालिकेची ३६०० पदे रिक्त

ठाण्यात घंडागाडीच्या फेऱ्या आणि वजनामध्ये घोटाळा करून घंटागाडी ठेकेदार दिवसाला लाखोंचा अपहार करीत असून त्याचा मलिदा सत्ताधाऱ्यांनाही मिळत आहे. एकूणच ठाण्याच्या कचऱ्यावर येथील सत्ताधारी शिवसेना पोसली जात असल्याने शिवसेनेकडून आम्ही मांडलेली लक्षवेधी फेटाळण्यात आली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ठाणे पालिकेकडेच ओला व सुका कचऱ्याच्या उपाययोजनांसंदर्भात ठोस उपाययोजना नसतानाही हा कर लादण्यात येत असल्याने ही करप्रणाली रद्द करावी, अशी मागणी करीत मिलींद पाटील यांनी ही लक्षवेधी मांडली होती. मात्र, ही लक्षवेधी स्वीकारण्यात आली नाही. या मागे मोठा भ्रष्टाचार असल्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मिलींद पाटील आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर परखड शब्दांमध्ये आरोप केला.

५ नव्या प्रकल्पांचे फक्त प्रतिज्ञापत्रच!

यावेळी मिलींद पाटील यांनी सांगितले की, ‘सन २०१३ मध्ये टेकाळे नावाच्या एका नागरिकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ठाणे महानगर पालिकेमध्ये कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही, पालिकेला त्या संदर्भात प्रकल्प उभे करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी ऑक्टोबर २०१९ पर्यंत कचरा विल्हेवाटीसंदर्भात ठोस उपाययोजना राबवण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी विनंती करून ठाण्यात कचऱ्याच्या विघटनासाठी ५ नवे प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे प्रतिज्ञापत्र प्रशासनाने सादर केले होते. प्रत्यक्षात अशा कोणत्याही प्रकल्पाची ठामपाने सुरुवात केलेली नाही, असे पाटील यांनी नमूद केले.


हेही वाचा – ठाणे, कल्याण आणि वसईकरांचा प्रवास लवकरच जलवाहतुकीतून !

घंटागाड्यांची अवस्था कचऱ्यासारखीच!

दरम्यान, घंटागाडीच्या फेऱ्यांमध्ये तर मोठा भ्रष्टाचार शिवसेनेच्या माध्यमातून केला जात असल्याचं पाटील यावेळी पत्रकार परिषदेच म्हणाले. घंटागाड्यांचे जे ठेकेदार आहेत ते सर्व शिवसेनेशी संबधित आहेत. पल्ले नावाच्या एका ठेकेदाराला वडोदरा आणि नांदेडमधून काळ्या यादीत टाकण्यात आलेले आहेत. तरीही याआधीचे कचऱ्याचे ३ टेंडर त्यालाच देण्यात आलेले आहेत. या बहाद्दराने स्वत:च्याच दोन कंपन्या दाखवून टेंडर भरले होते. घंटागाड्यांची अवस्था अत्यंत बिकट असून अनेक गाड्यांचे पासिंगही झालेले नाही. काही गाड्यांचा विमाही उतरवलेला नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याची भरपाई कोण देणार? असा सवाल उपस्थित करुन सत्ताधाऱ्यांना हे ठेकेदार पोसत असल्याने त्यांच्यासाठी निविदेतील अटी आणि शर्ती शिथिल केल्या जात आहे, असं पाटील म्हणाले. सन २००६ मध्ये कचऱ्यासाठी महसुली आणि वित्तीय खर्च असे एकत्रित फक्त ४० कोटींचे बजेट होते. आता तेच बजेट सुमारे ६०० कोटींवर गेले आहे. हे बजेट ठेकेदारांवर खर्च केले जात आहे, असा आरोप देखील पाटील यांनी केला.

कचरा वर्गीकरणाच्या नावानं बोंब!

हे घंटागाडी ठेकेदार न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांचे पालन करीत नाहीत. सीपी टँक येथे कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे, असे सांगितले जात असले तरी मुंब्रा येथे गोळा केलेला कचरा थेट डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे. तर, घंडागाडीमध्ये ओला-सुका कचरा टाकण्यासाठी वेगवेगळे कप्पे केले जात असले तरी खालील बाजूला कोणत्याही प्रकारचे वर्गीकरण होत नसून खालच्या बाजूला एकच पिशवी ठेऊन कचऱ्याची सरभेसळच होत आहे. टेकबिनच्या बाबतीतही असाच प्रकार आहे. वर दोन कप्पे आणि खाली एकच कप्पा असल्याने येथेही कचर्याकची सरमिसळच होत आहे; म्हणजेच टेकबिनमध्येही पैसेच खाण्याचे काम सत्ताधार्यांनी ठेकेदारांच्या माध्यमातून केले आहे, असे मिलींद पाटील म्हणाले.


तुम्ही हे वाचलंत का? – ठाणे आयुक्तांचे नवे आदेश, होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

कचरा हे शिवसेनेसाठी भ्रष्टाचाराचे कुरण – परांजपे

घनकचरा व्यवस्थापनामधून पैसा कमावणे हेच शिवसेनेचे धोरण आहे. त्यामुळे ही संघटना कचऱ्यावरच पोसली जात असून त्यांच्यासाठी कचरा हे कुरण असल्याचा आरोप आनंद परांजपे यांनी केला. सोसायट्यांमध्ये ओला-सुका कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. हा पैसा सामान्य ठाणेकर कसा उभारणार? त्यानंतरही त्यातून निर्माण झालेल्या कंपोस्टला बाजारपेठ ठाणे महानगर पालिका किंवा सत्ताधारी शिवसेना उपलब्ध करुन देणार आहे का? असा सवाल परांजपे यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्था नागरिकांकडून जे कर घेत असते, त्या कराच्या माध्यमातून नागरिकांना सोयी-सुविधा पुरवल्या पाहिजेत, असा साधा नियम आहे. मात्र, येथे सुविधा पुरवण्याऐवजी त्यांच्यावरच जादा कर लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार मानवतेच्या दृष्टीकोनातून पटणारा नाही, असे आनंद परांजपे यांनी सांगितले. आजवर टक्केवारीवरच शिवसेनेचे पालपोषण झालेले आहे. त्यामुळे आता ठाणेकरांच्या माथी कचरा कर मारून त्यातून स्वत:चा फायदा करुन घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही आनंद परांजपे यांनी केला.

First Published on: November 20, 2018 5:59 PM
Exit mobile version