ड्रग्स व्यसनांचे निर्मूलन, ओटीटीवर नियंत्रण हवेच

ड्रग्स व्यसनांचे निर्मूलन, ओटीटीवर नियंत्रण हवेच

भारत विकासाच्या मार्गावर जात असताना इतिहास, व्यवस्था, वर्तमानाची निंदा करून देशाबाबत अश्रद्धा निर्माण करण्याचे काही घटक प्रयत्न करत आहेत. प्राचीन मूल्यांवर हल्ला होतो. निंदा केली जाते व सूक्ष्म माध्यमातून सांस्कृतिक आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो. अशा लोकांनी आता हातमिळावणीदेखील केली आहे, असे सांगताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी अदेशातील वाढत्या ड्रग्सच्या व्यसनावर चिंता व्यक्त केली. तसेच सरकारला ड्रग्स व्यसनांचे पूर्ण निर्मूलन करावे लागेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर नियंत्रण नाहीये. तेथे कशाप्रकारचे चित्रपट येतात, काय काय येते? यावर नियंत्रण असायला हवे, अशी अपेक्षाही सरसंघचालकांनी व्यक्त केली.

संघाच्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते. सरसंघचालक पुढे म्हणाले की,ओटीटीवर कसे कसे चित्रपट येतात. आता तर मुलांच्या हातीदेखील मोबाईल आले आहे. ओटीटीवर नियंत्रण नाही. देशात अमली पदार्थाचे जाळे वाढत आहे. त्यावर नियंत्रण नाही. त्यातून येणार्‍या पैशांतून देशविरोधी कारवाया होतात. बिटकॉईनवर कोणत्या राष्ट्राचे नियंत्रण आहे? समाजहितासाठी या बाबींना नियंत्रित करण्याचे काम शासनाला करावेच लागेल असे त्यांनी सांगितले.

फाळणीचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. नवीन पिढीपर्यंत सत्य पोहोचायला पाहिजे. व्यवस्थेसोबतच लोकांचे मन बदलण्याचे प्रयत्न झाले तरच जातीभेद दूर होईल. समाजातील भेद वाढविण्याची भाषा वापरायला नको. लोकांना एकत्र जोडण्याची भाषा हवी व संवाद सकारात्मक असला पाहिजे. मंदिर, पाणी, स्मशान एकच असायला हवे. सामाजिक समरसता व्हायलाच हवी. मनातून भेद जाण्यासाठी संवाद व्हायला हवा. अनौपचारिक चर्चा हवा. जयंती, पुण्यतिथी, विशेष उत्सव एकत्रित मिळून झाले पाहिजे, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.

भारतातील दोन राज्यांतील पोलीस एकमेकांशी युद्ध करतात हे अयोग्य आहे. आपण एकाच देशाचे नागरिक आहोत ना..मग असले प्रकार का? संविधानाअंतर्गत आपण सर्वच एकाच देशाचे आहोत. व्यवस्था फेडरल असली तरी लोक फेडरल नाही. सत्तेत बसलेल्या लोकांकडून पोषक व्यवहार होत नाही, मग समाजाला दिशा कशी मिळणार? राजकारणातील स्वार्थासाठी काही लोक कपट करतात. असंतोष निर्माण करण्याचे प्रयत्न होतात. जाती, प्रदेश, भाषेच्या माध्यमातून देशात अराजकता उत्पन्न करण्याचे प्रयत्न होतात. तंत्रज्ञानाचा आधार घेत आगीत तेल ओतण्याचे काम होते, असे सरसंघचालक म्हणाले.

कोरोनामुळे नुकसान झाले. अनेक तरुण गेले. लोकांनी एकत्रित येत कोरोनाचा सामना व प्रतिकार केला. तिसर्‍या लाटेसाठीदेखील प्रतिकार सुरू आहे. ही लाट येणार नाही असे वाटते. जर आलीच तर परिणामकारक राहणार नाही. प्रत्येक गावात पाच ते सात कोरोनायोद्धा तयार व्हावे यासाठी संघाने देशपातळीवर प्रशिक्षण दिले आहे. देश नक्कीच कोरोनाला मात देईल. कोरोनामुळे आर्थिक क्षेत्रात नुकसान झाले आहे. परंतु लोकांमध्ये आर्थिक नुकसान भरून काढण्याचा आत्मविश्वास आहे, असेही मोहन भागवत यांनी सांगितले.

First Published on: October 16, 2021 6:30 AM
Exit mobile version