४० हजार होमगार्ड्स चार महिन्यांपासून बिनपगारी

४० हजार होमगार्ड्स चार महिन्यांपासून बिनपगारी

महाराष्ट्र होमगार्ड

सामान्य नोकरदाराचा पगार दोन दिवस जरी पुढे गेला तर त्याच्या जीवाची घालमेल होते. ईएमआय, मुलांच्या शाळेची फी, विविध प्रकारची बिलं सर्व काही डोळ्यासमोर येऊ लागतं. नोकरदारांप्रमाणेच राज्यातील होमगार्ड्सचीही अवस्था झाली आहे. सप्टेंबर २०१९ पासून राज्यातील ४० हजार होमगार्ड्सना पगारच मिळालेला नाही. ट्राफिक सांभाळण्याची जबाबदारी असो किंवा पाऊस, उत्सव, निवडणूक आणि आंदोलनात पोलिसांच्या मदतीसाठी उभे राहणारे होमगार्ड्स आता स्वतःच्या हक्काच्या वेतनासाठी आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत, अशी बातमी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिली आहे.

ऑगस्ट २०१९ पासून होमगार्डच्या पगारात वाढ करण्यात आलेली आहे. यापूर्वी त्यांना प्रतिदिन ३०० रुपये मानधन देण्यात येत होते. ते आता वाढवून ६७० करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्याचे मानधन मिळाल्यानंतर सप्टेंबर २०१९ पासून होमगार्ड्सना वेतन मिळालेले नाही. होमगार्ड कार्यालयाकडून याबाबत सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही होमगार्ड्सना अद्याप वेतन मिळालेले नाही.

होमगार्डचे वेतन देण्यासाठी सरकारकडून प्रतिवर्षी १०० कोटींचा निधी होमगार्ड विभागाला देण्यात येतो. मात्र वेतन वाढ केल्यानंतर हा निधी देण्यात आलेला नाही. सरकारकडे १३७.८३ कोटींचा निधी थकीत आहे. तसेच यावर्षी मार्च महिन्यात पुन्हा होमगार्डला १४०.५५ कोटी द्यावे लागणार आहेत. आधीचाच निधी थकीत ठेवलेला असताना आता नवीन निधी कसा मिळणार? या विवंचणेत होमगार्ड विभागाचे अधिकारी पडलेले आहेत. तर दुसऱ्या बाजुला वेतन लवकरात लवकर न मिळाल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा होमगार्ड्सनी दिला आहे.

First Published on: January 21, 2020 11:13 AM
Exit mobile version