आदिवासींच्या भात पिकावर वन विभागाचा नांगर!

आदिवासींच्या भात पिकावर वन विभागाचा नांगर!

कर्जत तालुक्यतील तेलंगवाडी येथील आदिवासी वन विभागाच्या ताब्यात असलेल्या जागेत पूर्वांपार भात शेती करीत आहेत. परंतु या आदिवासींना कोणतीही सूचना न देता लावलेली भात शेती पोलीस आणि वन विभागाने उद्ध्वस्त केली असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले झाले आहे. यावर आदिवासी संघटना आणि श्रमजीवी संघटना आक्रमक झाली आहे.
दरवर्षी आदिवासी तेथे भाताचे पीक घेत असतात. परंतु यावर्षी लावलेली भात शेती वन विभाग आणि पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना, नोटीस न देता भाताचे पीक यंत्राने आणि हाताने उद्ध्वस्त केले आहे.

यावेळी दमदाटी आणि महिलेवर हात उचलण्याचा प्रकार देखील पोलिसांनी केल्याचा आरोप आदिवासींनी केला आहे. या सर्व प्रकारचा निषेध करण्यात आला असून, आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. झालेल्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी अन्याय दूर करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्यावतीने सोमवारी कर्जत प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करणार येणार आहे. यात आचारसंहितेचा भंग झाल्यास यास वन अधिकारी आणि पोलीस जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला आहे.

तेलंगवाडी येथे वाडवडिलांपासून आम्ही भात शेती करीत आहोत. ती जागा वन विभागाच्या हद्दीत येत आहे. परंतु शेती लावण्याचा अगोदर जर सूचना दिली असती तर शेती लावली नसती. पीक तयार झाल्यानंतर वन विभाग आणि पोलिसांनी ही भात शेती उद्ध्वस्त केली असल्याने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे.
-जानू पादिर, शेतकरी

तेलंगवाडी हद्दीत 13 हजार रोपांची लागवड केली आहे. त्या लागवडीमध्ये आदिवासींनी भात लागवड केली आहे. या संदर्भात त्यांना अनेकवेळा सूचना केल्या होत्या. वन हक्क कायद्यांतर्गत तक्रारी किंवा दावा दाखक करण्याच्या सूचना केल्या होत्या. मंजुरीसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवून देऊ असे देखील सांगण्यात आले होते. परंतु तसे काही त्यांनी केले नाही. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
-जे. एम. सुपे, वनपाल, बोरगाव

वन विभागाने अतिक्रमण काढण्यासंदर्भात लेखी पोलीस ठाण्याला कळविले होते. त्यानुसार बंदोबस्त देण्यात आला होता. भात शेती काढून टाकण्याची कारवाई वन विभागाने केली आहे.
-केतन सांगळे, पोलीस उप निरीक्षक, नेरळ

First Published on: October 7, 2019 1:10 AM
Exit mobile version