Palghar News : अडीच लाखांची लाच घेताना वनपाल अटकेत, साथीदारालाही बेड्या

वसई : वनविभागाच्या जमिनीवर वाढीव बांधकाम केल्याने, त्याविरोधात कारवाई न करण्यासाठी एका वनपालाने पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी अडीच लाख रुपये घेताना मांडवी वन परिमंडळाच्या वनपालाला त्याच्या साथीदारासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau) अधिकाऱ्यांनी अटक केली.

रज्जाक रशिद मन्सुरी असे वनपालाचे नाव असून दानियाल हाजी खान असे त्याच्या साथिदाराचे नाव आहे. तक्रारदाराने वनजमिनीवर वाढीव बांधकाम केले होते. त्याविरोधात वनपाल रज्जाक रशिद मन्सुरी याने कारवाई न करण्यासाठी दानियाल खानच्या मार्फत पाच लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यावरून सापळा रचण्यात आला होता.

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर नाही, औरंगाबाद म्हणा…; माध्यमांविरोधात मुख्य सचिवांकडे तक्रार

तक्रारदाराने बुधवारी दुपारी दानियाल खानकडे लाचेपैकी अडीच लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दानियाल हाजी खानला ताब्यात घेतले. त्यानंतर रज्जाक मन्सुरीलाही पथकाने अटक केली. मन्सुरी आणि खानविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक अश्विनी पाटील, हवालदार पाटील, मदने, घोलप, चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

30 लाखांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक जाळ्यात
नाशिकमधील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदाच्या निवडप्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी 30 लाखांची लाच स्वीकारताना जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (वय 57) यांच्यासह त्यांचे साथीदार अ‍ॅड. शैलेश सुमतीलाल सभद्रा (वय 32) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (१५ मे) अटक केली. या कारवाईत खरे यांच्या घरझडतीतून तब्बल 15 लाखांची रोकड तर, सुमारे 33 लाखांचे 24 तोळे सोनेदेखील जप्त करण्यात आले होते.

नाशिक जिल्ह्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये तक्रारदार संचालकपदी निवडून आले आहेत. त्या निवडीविरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणावर जिल्हा उपनिबंधकांकडे सुनावणी सुरू आहे. बाजूने निर्णय देण्यासाठी जिल्हा निबंधक सतीश खरे व अ‍ॅड. शैलेश सभद्रा यांनी तक्रारदाराकडे 30 लाख रुपयांची मागणी केली होती.

हेही वाचा – पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून गिरीश बापट यांच्या सूनबाई इच्छुक; म्हणाल्या…

First Published on: May 17, 2023 9:42 PM
Exit mobile version