परिवर्तनचा ‘गड आला पण सिंह गेला!’

परिवर्तनचा ‘गड आला पण सिंह गेला!’

दहा वर्षे सातत्याने सत्तेवर असल्याने वाढलेली नाराजी, पवार कुटुंबियांतील अन्य सदस्यांचा संस्थेत वाढलेला हस्तक्षेप, प्रगती पॅनलची निवड करताना चुकलेले काही निर्णय, परिवर्तन पॅनलने निवडणुकीच्या तोंडावर उडवलेली आरोपांची राळ आणि सगळ्यांचीच भविष्यात सरचिटणीस होण्याची महत्वाकांक्षा असल्याने नीलिमा पवारांना एकाकी पाडण्याची अंतर्गत पातळीवर खेळली गेलेली चाल.. या सर्वांचा परिपाक म्हणजे मविप्रच्या सरचिटणीस पदावर परिवर्तन पॅनलचे अ‍ॅड. नितीन ठाकरे यांची झालेली अभूतपूर्व निवड.. दुसरीकडे डॉ. सुनील ढिकले यांनी आपल्या लौकीकाला साजेशी प्रचाराची रणनीती आखल्याने त्यांना बलाढ्य माणिकराव कोकाटे यांचा दणकून पराभव करता आला. हा पराभव ‘गड आला पण सिंह गेला’ या उक्तीची प्रचिती देणारा ठरला. संस्थेच्या सभासदांनी दिलेला कौल पाहता, संस्था कुणाच्या खासगी मालकीची नाही, सभासदांचे हित जोपासले गेलेच पाहिजे, असा संदेश या मतदानातून देण्यात आला, असेच म्हणावे लागेल.

राज्यात दुसर्‍या क्रमांकाची मोठी संस्था म्हणून नावारुपाला आलेली मविप्र संस्थेची निवडणूक यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला लाजवेल अशी झाली. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या केवळ फैरीच नव्हे तर संस्थेतील कथित भ्रष्टाचार आणि अनियमितता यांचीही जोरदार चर्चा झडली. त्यामुळे ना भूतो ना भवती.. अशी ही निवडणूक रंगतदार ठरली. क्रॉस वोटिंगने निवडणुकीत चुरस आणलीच; शिवाय सत्ताधार्‍यांविषयीच्या स्वाभाविक नाराजीचाही फटका प्रगती पॅनलला बसला. दीर्घ कालावधीनंतर सरचिटणीसपदावर यंदा निफाडकरांना पाणी सोडावे लागले. तब्बल २० वर्षे पवार कुटुंबियांचे वर्चस्व या संस्थेवर होते. त्यातही डॉ. वसंतराव पवार यांच्या निधनानंतर प्रगती पॅनलकडून संस्थेच्या सरचिटणीसपदाची धुरा नीलिमा पवार यांनी सलग 10 वर्षांहून अधिक काळ सांभाळल्याने त्यांच्यावरील नाराजीत वाढ होण्याची बाब स्वाभाविकच आहे. एका प्रवेशासाठी जेव्हा शंभर अर्ज येतात आणि त्यातील एकाचेच काम करणे अनिवार्य तेव्हा ९९ सभासद वा त्यांचे नातेवाईक नाराज होणे स्वाभाविकच आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून नीलिमा पवार यांची मुलगी अमृता आणि मुलगा प्रणव पवार यांनी संस्थेच्या कामकाजात हस्तक्षेपाचा अतिरेक केला होता. शिवाय जिल्ह्याबाहेरचे सभासद करुन घेतल्याने पवार कुटुंबियांवर सभासदांचा रोष होता. अ‍ॅड. ठाकरे नवीन सभासदांविरोधात आहेत, ही बाब सभासदांच्या मनावर ठासवण्यात नीलिमा पवारांना सपशेल अपयश आले. त्याचे थेट परिणाम निवडणुकीत त्यांना स्वतःला भोगावे लागले. अर्थात, या विजयात अ‍ॅड. नितीन ठाकरे यांचे कर्तृत्व काहीच नाही, असेही म्हणता येणार नाही. गेल्या पाच वर्षात अ‍ॅड. नितीन ठाकरे यांच्याकडे बर्‍यापैकी मोकळा वेळ होता. या वेळेचा सदुपयोग करुन त्यांनी जिल्हाभरात आपल्या नेतृत्वाच्या गुणांवर पेरणी अतिशय कुशलतेने केलेली होती. त्यातच त्यांच्या मवाळ स्वभावाने त्यांची प्रतिमा अधिकच उजळून निघाली. पवार आणि ठाकरे यांच्या स्वभावांची तुलना करता ठाकरेंच्या झोळीत सभासदांनी अधिक मतांचे दान टाकणे ही बाब सभासदांना हुकूमशाही वृत्तीचा नेता नको असल्याच्या बाबीला अधोरेखित करते. कोविडसारखा संवेदनशील मुद्दा अतिशय कुशलतेने हाताळत अ‍ॅड. ठाकरे यांनी सभासदांच्या मनाचा ठाव घेतलाच; शिवाय घराणेशाहीच्या विरोधात वातावरण तयार करण्यातही त्यांना यश आले. स्व. बाबुराव ठाकरे यांच्या पुण्याईचे अ‍ॅड. ठाकरे यांच्या विजयात सर्वात मोठे योगदान आहे, असेही म्हणता येईल.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत परिवर्तनच्या बाबतीत ‘गड आला पण सिंह गेला’ असे म्हणावे लागेल. आ. माणिकराव कोकाटे यांची उमेदवारी चुकली होती असेही म्हणता येणार नाही. परंतु, प्रगतीने कोकाटेंपेक्षाही सक्षम उमेदवाराला या पदावर संधी देऊन योग्य खेळी केली. यात कोकाटेंची हाराकिरी झाली असली तरी त्यांच्या राजकीय अनुभवाचा आणि ताकदीचा मोठा फायदा परिवर्तनला झाला. आ. कोकाटेंकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहेच; शिवाय निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या बुथ प्रमुखांपासूनची साखळी असल्याने त्याचा उपयोग परिवर्तन पॅनलला झाला. कोकाटेंचा फटकळ स्वभाव त्यांच्या विजयाच्या आड आला. केदा आहेर आणि माणिकराव कोकाटे यांना जिल्हा बँकेचे राजकारण मविप्रत नडलेे. शिवाय बँकेच्या वतीने कर्जबाजारी शेतकर्‍यांना ज्या नोटीसा देण्यात आल्या त्यात मविप्रच्या सभासदांची संख्या लक्षणीय होती, असेही बोलले जाते. त्याचा फटका आहेर यांना बसला. दुसरीकडे डॉ. सुनील ढिकले यांच्या मनमिळावू स्वभावाने त्यांना दणदणीत विजय मिळवून दिला.

माजी खासदार स्व. उत्तमराव ढिकले यांच्याकडून घेतलेले बाळकडू, डॉ. सुनील यांचे प्रत्येक तालुक्यात असलेले नातेसंबंध आणि आ. राहुल ढिकलेंसह सुनील खुणे यांच्यासारखे भक्कम पाठीराखे लाभल्याने डॉ. सुनील यांची उमेदवारी बळकट झाली. अर्थात, निवडणुकीच्या आधीपासूनच डॉ. सुनील ढिकले आणि सचिन पिंगळे हे प्रगती पॅनलचे सर्वात सक्षम उमेदवार असल्याची चर्चा होती. यातील डॉ. ढिकले यांना अन्य कोणत्याही पदावर उभे केले असते तरी विजयाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार होती. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी निफाडचे माणिकराव बोरस्ते यांना धोबीपछाड देणे ही बाब अनेकांसाठी धक्कादायक ठरली. यात माणिकराव बोरस्ते यांची वयानुरुप गेल्या काही वर्षांपासून चिडचीडही वाढल्याने त्यांच्या फाटक्या तोंडाचा फटका त्यांना स्वत:लाच बसला. माणिकरावांना अपेक्षित मते न मिळणे ही बाबही नीलिमा पवार यांच्या पराभवाचे एक कारण म्हणता येईल. चिटणीसपदावर डॉ. प्रशांत पाटील आणि दिलीप दळवी यांची झालेली लढतही लक्षवेधी ठरली. डॉ. पाटील यांनी पदवीधर मतदार संघाची लढवलेली निवडणूक फलदायी ठरली. शिवाय नातेसंबंध, जनसंपर्क आणि माजीमंत्री सुभाष भामरे यांनी निवडणूक काळात केलेली बहुमोल मदत त्यांना विजयाच्या समीप घेऊन गेली. उपाध्यक्ष आणि उपसभापतीपदाची निवडणुकही चुरशीची झाली.

First Published on: August 30, 2022 2:00 AM
Exit mobile version