भाग ३ : मुलगा करायचा इंटरकॉमवर महिलेशी अश्लिल संवाद

भाग ३ : मुलगा करायचा इंटरकॉमवर महिलेशी अश्लिल संवाद

नाशिक : शहरातील १६ वर्षीय मुलाने शारीरिक आकर्षणातून २५ वर्षीय मामीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच आता शहरातील नामांकित इंग्लिश मीडियम शाळेतील १४ वर्षीय मुलानेही पाच इमारतीच्या गृहप्रकल्पातील एका अपार्टमेंटमधील मुलगा घरात कोणीही नसताना दुसर्‍या अपार्टमेंटच्या महिलेशी अश्लिल संवाद करत असल्याचे समोर आले आहे. त्यातून पीडित महिलेला शारीरिक व मानसिक त्रास झाला.

विशेष म्हणजे, संशयित मुलगा कोण ते समजत नसल्याने आणि त्याचे अश्लिल बोलणे सुरु असल्याने पीडित महिला अनेक दिवस उपाशीपोटी राहायची. तिने ही बाब सुरुवातीला बदनामीपोटी पतीसह विश्वासू व्यक्तींना सांगितली नव्हती. मात्र, सहनशीलता संपल्याने तिने ही बाब पतीला सांगितली. त्यानंतर पतीने इंटरकॉमवर कॉल करणारा क्रमांक शोधताच या प्रकरणाचा भांडाफोड झाला.

शहरातील एका गृहप्रकल्पांमधील रहिवाशांच्या सुरक्षितेसाठी इंटरकॉम सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या क्रमांकावर फ्लॅटधारकांसह सुरक्षारक्षक, इमारतीतल रहिवाशी दुसर्‍या फ्लॅटमधील व्यक्तींना पाहुण्यांसह परिचित व्यक्ती आल्याची माहिती देतात. मात्र, या इंटरकॉमचा किशोरवयीन मुलगा दुरुपयोग केल्याचे समोर आले. मुलास शेजारील इमारतीमध्ये राहणारी महिला आवडायची. तिचे राहणीमान त्याला आकर्षक वाटायचे. त्याने मोबाईलवर मुलांचे महिलांशी असलेले प्रेमसंबंध पाहिले होते. त्यामुळे त्याने तिच्याशी संवाद इंटरकॉमवर सुरु केला. तो महिलेशी बोलायचा त्यावेळी तिच्याही घरात कोणी नसायचे. त्याचे बोलणे ऐकून महिलेला त्रास झाला.

सुरुवातीला बदनामीपोटी तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्याचे सतत कॉल सुरु झाल्याने ती मानसिक ताणतणावात आली. शेवटी तिने आपबिती पतीला सांगितली. त्यानंतर पतीने इंटरकॉम वर येणारा इनकमिंग कॉलक्रमांक आणि फ्लॅट क्रमांक शोधला. मात्र, पीडित महिला व तिचा पती आपल्या कॉलची वाट पाहत असल्याचे समजताच त्याने कॉल करणे बंद केले. शिवाय, त्या मुलास वडील नसल्याने आणि तो अल्पवयीन असल्याने पीडित महिलेसह तिच्या पतीने त्याला समज दिली. तेंव्हापासून मुलाने इंटरकॉम कधीही कॉल केले नाही. मात्र, या प्रकाराला पीडित महिलेला झालेला शारीरिक व मानसिक त्रास ती विसरलेली नाही.

इंटरनेट, मोबाईलचा वापर अभ्यासासाठी अपरिहार्य असला तरी मुलामुलींनी त्याचा किती आणि कसा वापर करावा, याचे नियंत्रण पालकांनी ठेवणे गरजेचे आहे. अनेकदा पालक किशोरवयीन मुलामुलींना मोबाईल विकत घेऊन देतात. त्याचा दुरुपयोग केल्याचे समोर आल्यानंतर पश्चाताप करतात. त्यामुळे शक्यतो १७ वर्षांखालील मुलामुलींना पालकांनी स्वत:चाच मोबाईल अभ्यासासाठी द्यावा. कारण अनेकदा गेम्स खेळताना किंवा वेबसिरीज बघताना अश्लिल दृश्य पाहून मुलामुलींमधील शारीरिक आकर्षण वाढते. त्यातूनच पुढे मुले गुन्हेगारीकडे किंवा चुकीच्या गोष्टींकडे वळतात. मुलांमुलींमधील शारीरिक आकर्षण नैसगिक असले तरीही त्यातील चांगले-वाईट काय आहे, हे पालकांनी सांगितले पाहिजे. त्यासाठी मुलांशी सुसंवाद अत्यंत गरजेचा आहे. तसे झाले तर मुले वाम मार्गाला जाणार नाहीत. : डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ

व्हॉट्स अ‍ॅपवर कळवा मत

शहरासह जिल्ह्यातील असंख्य बालकांमध्ये मोठ्या वयाच्या व्यक्तींचे आकर्षण वाढत आहे. त्यातून पुढे गंभीर गुन्हे घडण्याचेही प्रमाण वाढले आहे. ज्या वयात खेळ खेळले जावेत, अभ्यास करावा त्या वयात मुले प्रेमात पडत असल्याने त्याचे दूरगामी परिणाम समाजात घडत आहेत. या मुळे सामाजिक स्वाथ्यावर परिणाम होतो. मुलांच्या भविष्यकालीन वाटचालीवरही परिणाम होतो; शिवाय पवित्र नातेसंबंधांचे महत्वही पुसट होते. नाशिकमध्ये अलिकडेच घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘आपलं महानगर’मध्ये ‘उमलत्या वयातील आकर्षण’ या वृत्तमालिकेव्दारे प्रकाशझोत टाकला जात आहे. अशा घटना घडूच नये, यासाठीच्या उपाययोजना या मालिकेव्दारे सुचवण्यात येणार आहेत. यासंदर्भातील आपली मते आणि प्रतिक्रिया ९०२२५५७३२६ या व्हॉटसअ‍ॅप क्रमांकावर संदेशस्वरुपात पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे.

First Published on: February 23, 2023 1:04 PM
Exit mobile version