पंतप्रधान मोदींच्या चेम्बरमध्ये झालेल्या चर्चेचा पवारांकडून खुलासा

पंतप्रधान मोदींच्या चेम्बरमध्ये झालेल्या चर्चेचा पवारांकडून खुलासा

शरद पवार आणि नरेंद्र मोदी भेट (संग्रहित छायाचित्र)

राज्यात २०१९ मध्ये सत्तानाट्य सुरू असतानाच शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला त्यांच्या चेम्बरमध्ये गेले होते. यावर तर्कवितर्क लढवले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याचा खुलासा केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवारांच्या घेतलेल्या मॅरेथॉन मुलाखतीत पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले. या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या चेम्बरमध्ये काय चर्चा झाली याचा खुलासा केला आहे.

२०१९ मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी तुम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत होता. पण ऐनवेळी यूटर्न घेतला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. संजय राऊतांच्या प्रश्नावर शरद पवारांनी तपशीलवार उत्तर दिलं. “शिवसेनेसोबत सरकार स्थापन करायचं नाही. शिवसेनेला सोबत घ्यायचं नाही. त्यामुळे स्थिर सरकार बनविण्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्या, असं भाजपचे काही नेते आमच्याशी बोलत होते. आमच्यातल्या काही सहकाऱ्यांशी, माझ्याशीही एक-दोनदा बोलले. बोलले नाही हे खरं नाही, ते बोललेच.. एकदा नाही… दोनदा नाही… तीनदा बोलले… आणि त्यांची अशी अपेक्षा होती की, पंतप्रधानांचे आणि माझे संबंध चांगले आहेत आणि त्यामुळे पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करावा आणि मी त्याला संमती द्यावी आणि म्हणून माझ्या कानावरसुद्धा हा निरोप आला. आणि त्या वेळेला तो निरोप आल्यानंतर देशाचे प्रधानमंत्री आहेत, प्रधानमंत्र्यांकडे आपल्याबद्दल किंवा आपल्या पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये म्हणून मी स्वतः पार्लमेंटमध्ये त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन त्यांना सांगितलं की, आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही. जमलं तर आम्ही शिवसेनेसोबत सरकार बनवू किंवा विरोधी पक्षात बसू, पण आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. आणि हे मी सांगायला जाताना एक गृहस्थ पार्लमेंटमध्ये माझ्या शेजारी होते, त्यांचं नाव संजय राऊत. त्यांना मी सांगून गेलो की, हे मी त्यांना (पंतप्रधानांना) सांगायला जातोय. मी परत आलो त्यावेळी राऊत तिथेच होते. त्यांच्या कानावरही मी पंतप्रधानांबरोबरची चर्चा घातली,” असा खुलासा शरद पवारांनी केला.

First Published on: July 13, 2020 8:27 AM
Exit mobile version