उंटांना नेण्यासाठी खास राजस्थानहून येणार ‘रायका’ जमातीचे लोक; तसेच ‘या’ कारणाने पायीच नेले जाणार

उंटांना नेण्यासाठी खास राजस्थानहून येणार ‘रायका’ जमातीचे लोक; तसेच ‘या’ कारणाने पायीच नेले जाणार

नाशिक : नाशिक शहरात दाखल झालेल्या १५० उंटांना लवकरच राजस्थानला पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी धरमपूर येथील श्रीमद् राजचंद्र मिशन संस्थेने तयारी दर्शविली आहे. वाहतुकीचा सर्व खर्च ही संस्था करणार असून, राजस्थानमधील महावीर कॅमल सँक्च्युरीमध्ये या उंटाचे पुनर्वसन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. या उंटांना घेऊन जाण्यासाठी खास राजस्थानहून रायका (पशुपालक) बोलावण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाद्वारे येत्या दोन दिवसांत या सर्व उंटांच्या लसीकरणाला सुरूवात केली जाणार आहे.

जिल्ह्यात धुळे, सटाणा, दिंडोरी, मालेगाव तालुक्यातून मार्गक्रमण करत उंटांचा मोठा जत्था दाखल झाला होता. अ‍ॅनिमल वेल्फेअरच्या मदतीने हे उंट ताब्यात घेण्यात आले. ज्यांनी हे उंट नाशकात आणले ते सर्वजण सध्या फरार आहेत. त्यामुळे हे उंट नेमके कुठे आणि कशासाठी नेले जात होते, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. सध्या या उंटांचे चुंचाळे येथील पाजरांपोळमध्ये संगोपन केले जात आहे. पांजरापोळमध्ये १०७ उंट तसेच, मालेगावजवळील गोशाळेत ४३ उंट आश्रयास आहेत. महाराष्ट्रात उंट आढळून येत नसल्याने त्यांच्या संगोपनाची कला अवगत असणारे पशुपालकही नसल्याने पांजरापोळमध्ये या उंटांची देखभाल करताना कर्मचार्‍यांना अडचणी येत आहेत.

उंटांच्या वैद्यकीय चाचणीसाठी हात लावल्यानंतर काही कर्मचार्‍यांना उंटांनी चावाही घेतला. त्यामुळे उंटांचे टॅगिंग करणेही अवघड झाले आहेत. यासाठी आता राजस्थानमधून खास रायका (पशुपालक) यांना पाचारण करण्यात आले आहे. सुमारे १० ते १२ रायका हे येत्या दोन दिवसांत नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. या रायकांच्या मदतीने उंटांचे टॅगिंग करण्यात येऊन त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर हे उंट रस्तेमार्गे पायी राजस्थानकडे रवाना होतील. या प्रवासाचे टप्पेही ठरविण्यात आले असून, या संपूर्ण मार्गावर पोलिसांची मदत घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. राजस्थानमधील सिरोही येथील महावीर कॅमल सँक्च्युरी येथे त्यांचे संगोपन केले जाणार आहे.

वातावरण मानवत नसल्याने मृत्यु

नाशिकमध्ये दाखल झालेल्या १५४ उंटांपैकी ४ उंटांचा आतापर्यंत मृत्यु झाला आहे. यात ३ उंटांचा नाशिकच्या पांजरापोळमध्ये तर एका उंटांचा मालेगावमध्ये मृत्यु झाला आहे. यामागे दोन कारणं समोर आली आहेत. या उंटांना पुरेसे अन्नपाणी न दिल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे तर दुसरे प्रमुख कारण म्हणजे नाशिकचे वातावरण त्यांना मानवत नसल्याने उंटांचा मृत्यु होत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर राजस्थानला पाठवणे आवश्यक आहेे असे पशुवैद्यकिय अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. मृत उंटांचे शवविच्छेदनातून अवयवांचे काही नमुने पुणे येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत.

उंटांना दररोज ७० कि.मी चालवणे आवश्यक

उंटांच्या सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने त्यांना दररोज साधारण ६० ते ७० किलोमीटरपर्यंत चालवणे आवश्यक असते. उंट जितके चालतील तेवढी त्यांची प्रकृती ठणठणीत राहते. त्यामुळे त्यांना राजस्थानपर्यंत पोहोचविण्यासाठी पायी चालवून नेणे हाच पर्याय असल्याचे राजस्थानस्थित संस्था व राजचंद्र मिशन संस्थेकडून सांगण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

रायका म्हणजे काय

ज्याप्रमाणे आपल्याकडे गुरे चारणारे किंवा मेंढपाळ असतात तसेच, राजस्थानमध्ये रायका असतात. हे रायका पिढ्यांनपिढ्यांपासून उंट, शेळी तसेच पाळीव प्राण्यांचे संगोपन करतात. हा समाज मूळ राजस्थानमधील असून, पशुपालन हा यांचा मुख्य व्यवसाय असतो. उंट प्रामुख्याने वाळवंटात राहत असल्याने रायका जमात हा उंटांचे संगोपन करतो. त्यामुळे उंटांचा सांभाळ करण्याचे कसब त्यांच्याकडे असल्याने आता पांजरापोळमधील उंटांना हाताळण्यासाठी व पुन्हा राजस्थानात पाठविण्यासाठी रायकांची मदत घेण्यात येणार आहे.

उंटांना फक्त पॅरासाईट म्हणजे परोपजीवांचा अर्थात गोचिड किंवा गोमाशीपासून त्रास होतो. तसेच, सराहचा त्रास असतो. याव्यतिरिक्त कोणताही आजार होत नाही. हे उंट पुन्हा राजस्थानमध्ये पाठवले जाणार असल्याने या प्रवासात त्यांनी प्रकृती ठिक राहावी तसेच गोचिड, गोमाशीचा त्रास होऊ नये यासाठी त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यांची तपासणी करून जिल्हाधिकार्‍यांची परवानगी घेतली जाईल. त्यानंतर त्यांना सदर संस्थेच्या ताब्यात दिले जाईल. राजस्थानच्या सिरोही येथील महावीर कॅमल सँक्च्युरी येथे त्यांचे संगोपन केले जाणार आहे. : डॉ. गि. र. पाटील, पशुसंवर्धन उपायुक्त, नाशिक

First Published on: May 12, 2023 1:40 PM
Exit mobile version