मंदिरांमध्ये प्लॅस्टिक सापडल्यास मंदिरांवर कारवाई होणार – रामदास कदम

मंदिरांमध्ये प्लॅस्टिक सापडल्यास मंदिरांवर कारवाई होणार – रामदास कदम

Plastic Ban

राज्यभरात प्लॅस्टिकबंदी लागू करण्यात आली होती. परंतु काही कालावधीनंतर प्लॅस्टिकबंदीच्या अनेक अटी शिथील करण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा एकदा प्लॅस्टिकचा राज्यभर वापर सुरू झाला आहे. आता पुन्हा एकदा या बंदीवर विचार सुरू आहे, त्यामध्ये बदल केले जात आहेत. आता मंदिर परिसरात प्लॅस्टिक आढळल्यास मंदिराची समिती, न्यास, विश्‍वस्त किंवा व्यवस्थापन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिला आहे. मंत्रालयातील त्यांच्या दालनात बुधवारी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यात प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. परंतु अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. प्रामुख्याने मंदिरांमध्ये प्रसाद आणि पूजेच्या साहित्यासाठी प्लॅस्टिकचा वापर होत असल्याचे दिसून येते.

मंदिरातील प्लॅस्टिक वापरासंदर्भात नाशिकमध्ये महापालिकचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी मंदिरांवर कारवाई केली होती. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही राज्याच्या दौऱ्यावर असताना मंदिर परिसरात भेटी देत कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कदम यांनी शिर्डी येथील साईबाबा मंदिर, दादरचे सिद्धिविनायक मंदिर, माहूरच्या रेणुकादेवीच्या मंदिरांना भेटी दिल्या. तेथे प्लॅस्टिकसंदर्भात कारवाईदेखील केली. तसेच मंदिर व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना पाच हजार रुपये दंड ठोठावला होता.

प्लॅस्टिक बंदीसंदर्भातल्या नियमांचे जी व्यक्ती, कार्यालये किंवा ज्या संस्था पालन करणार नाही त्यांच्यावर पर्यावरण नियंत्रण आणि कचरा व्यवस्थापनातील कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात येत्या दोन दिवसांमध्ये राज्यभरातील सर्व देवस्थानांना नोटिसा पाठवण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या धोरणाच्या आनुषंगाने देवस्थान व्यवस्थापनाने प्लॅस्टिक मुक्‍तीबाबत कार्यवाही करणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न केल्यास मंदिरांच्या समितीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येतील अशी माहिती रामदास कदम यांनी दिला.

First Published on: October 18, 2018 10:27 PM
Exit mobile version