Lata Mangeshkar : लतादीदींच्या निधनानं मोठी पोकळी निर्माण झालीय, पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

Lata Mangeshkar  : लतादीदींच्या निधनानं मोठी पोकळी निर्माण झालीय, पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे.

लतादीदींच्या निधनानं मोठी पोकळी निर्माण झालीय. ती पोकळी भरून काढता येणार नाही, असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलंय.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले होते, अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनिया आणि नंतर कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. तसेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू करण्यात आले होते, त्या उपचारांनाही चांगला प्रतिसाद देत होत्या. विशेष म्हणजे गायिका लता मंगेशकर यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आल्याची माहितीही काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्यांचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला होता. परंतु आज त्यांची प्राणज्योत मालवलीय. यापूर्वीही ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना नोव्हेंबर २०१९ मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नितीन गडकरी यांनी लतादीदींना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली

लतादीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.

ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील.

लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळला, जयंत पाटलांनी व्यक्त केली शोकभावना

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अनेक दशकं भारतात आणि भारताबाहेर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे. संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केली आहे.

लतादीदी जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी गायलेली गीते आपल्यात कायम राहतील. मला आठवतंय की एक वेळ होती, जेव्हा सकाळी रेडिओ ऑन करून दिदींच्या आवाजाने अनेकांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. त्यांनी गायलेले ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन देत त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला त्यावेळचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्या आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले, ते स्वर आणि सूर आता दिदींच्या स्मृती सदैव तेवत ठेवेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि परिवाराच्यावतीने जयंत पाटील यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लतादीदींना वाहिली श्रद्धांजली

लताजींचं निधन माझ्यासाठी मनहेलावून टाकणारं आहे. जसं जगभरातील लाखो लोकांसाठी भारताचं अवघं सौंदर्य त्यांच्या गाण्यांमध्ये सामावलं आहे. भारतरत्न, लताजींचे कर्तृत्व अतुलनीय राहील, असं ट्विट करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.


हेही वाचा : Lata Mangeshkar Passes Away: ज्येष्ठ गायिका लतादीदी काळाच्या पडद्याआड; ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


 

First Published on: February 6, 2022 10:31 AM
Exit mobile version