घरताज्या घडामोडीLata Mangeshkar Passes Away: ज्येष्ठ गायिका लतादीदी काळाच्या पडद्याआड; ९३व्या वर्षी घेतला...

Lata Mangeshkar Passes Away: ज्येष्ठ गायिका लतादीदी काळाच्या पडद्याआड; ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

भारतरत्न आणि गानकोकिळा असलेल्या लता मंगेशकरांचे आज निधन झालंय. वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मल्टी ऑर्गन फेलियरमुळे लतादीदींचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच आज त्यांची प्राणज्योत मालवलीय. अनेक दशके मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले होते, अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना न्यूमोनिया आणि नंतर कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. तसेच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू करण्यात आले होते, त्या उपचारांनाही चांगला प्रतिसाद देत होत्या. विशेष म्हणजे गायिका लता मंगेशकर यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आल्याची माहितीही काही दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्यांचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला होता. परंतु आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवलीय. यापूर्वीही ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना नोव्हेंबर २०१९ मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

२८ सप्टेंबर १९२९ला मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता या आपल्या आई-वडिलांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या होत्या. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत. लता यांना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांच्या होत्या, तेव्हा वडील पंडित दीनानाथ मंगेशकरांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला. त्यानंतर लतादीदींनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत लता मंगेशकर यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये ३० हजार गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांना सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कारांसह इतर डझनभर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -