‘पुण्याच्या विकासात त्यांचा मोठा वाटा’, पंतप्रधानांनी वाहिली गिरीश बापटांना श्रद्धांजली

‘पुण्याच्या विकासात त्यांचा मोठा वाटा’, पंतप्रधानांनी वाहिली गिरीश बापटांना श्रद्धांजली

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आपल्या ट्वीटरवरून गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बापटांसाठी मोदींनी खास ओळी देखील लिहिल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटच्या माध्यमातून लिहिले आहे की, “श्री गिरीश बापटजी हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते, ज्यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासात त्यांचा मोठा हात आहे. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती.”

गिरीश बापट हे भाजप पक्षातील ज्येष्ठ राजकारणी होते. त्यांनी पुण्याच्या विकासामध्ये महत्त्वाचे असे योगदान दिले आहे. कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणूकीत ते आजारी असताना देखील व्हिलचेअरवर बसून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. त्याचवेळी त्यांची राजकारणाप्रती आणि त्यांच्या मतदारसंघाप्रती असलेली निष्ठा दिसून आली होती.

गिरीश बापट यांनी त्यांच्या चार दशकांच्या राजकीय किर्दीमध्ये खासदार, आमदार, नगरसेवक, कामगार नेता, राज्याच्या मंत्रीमंडळात विविध खात्यांचे मंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि संघ स्वयंसेवक अशा विविध पदांवर काम केले आहे. पुण्यातील राजकारणावर आणि जिल्ह्यातील मतदारसंघांवर त्यांची चांगली पकड होती. बापट यांना राजकारणामध्ये “भाऊ” म्हणून संबोधले जायचे. ते पुणे महानगरपालिकेमध्ये तीन वेळा नगरसेवक, सलग पाच वेळा कसबा पेठ मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवून ते खासदारपदी देखील निवडून आले. पण गेल्या काही महिन्यांपासून ते प्रकृती अस्वस्थामुळे राजकारणापासून दूर असलेले पाहायला मिळाले.

दरम्यान, आज बुधवारी (ता. २९ मार्च) सायंकाळी सात वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. गिरीश बापट यांच्या निधनावर राज्यासह देशभरातील राजकीय नेतेमंडळींनी शोक व्यक्त केला आहे. तर सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.


हेही वाचा – Girish Bapat passed away: संघ स्वयंसेवक, कामगार नेते ते खासदार ‘अशी’ राहिली गिरीश बापटांची चार दशकांची कारकिर्द

First Published on: March 29, 2023 2:53 PM
Exit mobile version