एचडीआयएलचे संचालक सारंग आणि राकेश वाधवान यांना अटक

एचडीआयएलचे संचालक सारंग आणि राकेश वाधवान यांना अटक

RBI ने PMC बँकेवरील निर्बंधांत केली वाढ, खातेधारकांवर होणार परिणाम

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) 4 हजार 355 कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार घोटाळ्याप्रकरणी अखेर एचडीआयएलचे अध्यक्ष राकेशकुमार कुलदिपसिंग वाधवान आणि महाव्यवस्थापकीय संचालक सारंग राकेशकुमार वाधवान या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या दोघांनी गुरुवारी दिवसभर चौकशी सुरु होती. त्यात त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. तसेच त्यांचा या गुन्ह्यात सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आगामी काळात इतर काही बड्या अधिकार्‍यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाधवान यांच्या ३५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर पोलिसांनी टाच आणल्याचेही सांगण्यात येते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रशासकांच्या आदेशावरुन जयबीरसिंग मठ्ठा यांनी दिलेल्या लेखी तक्रार अर्जानंतर पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. पीएमसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि इतर पदाधिकार्‍यांनी 2008 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत एचडीआयएल कंपनीला कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिले होते. भांडुपच्या पीएमसी बँकेतून या कर्जाचे वाटप झाले होते. मात्र एचडीआयएल कंपनीकडून कर्जाची परतफेड झाली नव्हती. या बँकेतील ठराविक कंपन्यांची मोठी कर्ज खाती, कर्ज परतफेड होत नसल्याने अनुत्पादक कर्ज (एनपीए) झाली होती. असे असतानाही त्यांना अनुत्पादक कर्ज घोषित करण्यात आले नव्हते. बँकेच्यावतीने अशा कंपन्यांची माहिती जाणीवपूर्वक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापासून लपविण्यात आली.

कमी कर्ज रक्कमेच्या बोगस कर्ज खात्यांचा बँकेचा खोटा अभिलेख तयार करुन आरबीआयला माहिती सादर करुन दिशाभूल करण्यात आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात बँकेचे 4 हजार 355 कोटी 46 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या गैरव्यवहार बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष तसेच इतर पदाधिकार्‍यांनी संबंधित कंपन्याच्या संगमताने केला होता. त्यात एचडीआयएल कंपनीला सर्वाधिक कर्जाचे वाटप झाले होते. हा गुन्हेगारी स्वरुपाचा कट असल्याचे उघडकीस येताच जयबीरसिंग मठ्ठा यांनी भांडुप पोलिसांत ही तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या सर्व आरोपींविरुद्ध 409, 420, 465, 466, 471 सहकलम 120 ब भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून चौकशी सुरु आहे.

याच गुन्ह्यांत गुरुवारी एचडीआयएलचे अध्यक्ष राकेशकुमार वाधवान आणि महाव्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवन यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते, दिवसभर कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत किंवा कुठलीही कागदपत्रे जमा केली नाहीत. या गुन्ह्यात त्यांचा सहभाग उघडकीस येताच पोलिसांनी त्यांना अटक केली. या कंपनीसह त्यांच्या सलग्न कंपनीच्या सुमारे 44 बँक खात्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली असून या कंपनीच्या बँक खात्यात जमा झालेल्या व्यवहाराची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पीएमसी बँक गैरव्यवहारप्रकरणी अटकेची ही पहिलीच कारवाई आहे. लवकरच इतर अधिकार्‍यांसह पीएमसी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

पीएमसी बँकेवर २३ सप्टेंबर रोजी आरबीआयने निर्बंध घातले. बँकेत अनियमितता आढळून आल्यामुळे घालण्यात आलेल्या या निर्बंधामुळे सहा महिन्यांपर्यंत बँकेच्या खातेधारकांना केवळ १० हजार रुपये काढण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे एकच हल्लकल्लोळ माजला. पीएमसी बँकेचे अध्यक्ष वारेयाम सिंग हे २००६ आणि २०१५ मध्ये एचडीआयएलच्या मंडळावर होते. त्यानंतर त्यांची पीएमसी बँकेत संचालक म्हणून नियुक्ती झाली. पुढे ते बँकेेचे अध्यक्षही झाले.

First Published on: October 4, 2019 6:20 AM
Exit mobile version