बोकडवीरामध्ये खारफुटीवर विषप्रयोग!

बोकडवीरामध्ये खारफुटीवर विषप्रयोग!

जागेचा वापर नसल्याने आणि समुद्राच्या भरतीचे खारे पाणी सखल भागात येत असल्यामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी खारफुटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विकासकांनी ही खारफुटी नष्ट करण्यासाठी आता विषारी रसायने आणि विष प्रयोग करायला सुरुवात केली आहे. बोकडवीरा गावासमोरील सिडकोच्या प्लॉटमधील खारफुटी मारण्यासाठी विषप्रयोग केला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. खारफुटी मारण्यासाठी वापरण्यात आलेल्या रसायनांमुळे येथे येणारे पाणी काळे ठिक्कर होते. त्यामुळे मासळीसुद्धा येत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.

समुद्र आणि खाडीच्या किनार्‍यांवर मोठ्या प्रमाणात भराव झाले आहेत. त्यामुळे पाण्याचे प्रवाह बदलले आहेत. त्यातच या भागातील शेती पिकविण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही जमीन ओसाड झाली. त्यात मोठ्या प्रमाणात खारफुटीची वाढ झाली आहे. या खारफुटीमुळे जमीनीची धूप थांबविली जात असली आणि सागरी जैवविविधता जोपासली जात असली तरी विकासकामांसाठी ही खारफुटी अडथळा ठरत आहे. खारफुटी तोडण्याची परवानगी मिळण्याची प्रक्रिया खूप किचकट असते. त्यामुळे अनेकदा विकासक ही प्रक्रिया टाळण्यासाठी वन विभाग व महसूल विभागाच्या नकळत खारफुटी तोडून नष्ट करतात. मात्र अनेकांवर गुन्हे दाखल झाल्याने त्यावर नामी शक्कल काढून विकासकांनी खारफुटींच्या झाडांवर चक्क विषप्रयोग किंवा रसायने टाकून ती मारण्याची नवीन कल्पना शोधून काढली आहे.

काही ठिकाणी खारफुटीवर कचरा टाकून ती जाळली जाते. त्यामुळे खारफुटीचे जंगल मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहे. त्यात आता घातक रसायनांचा वापर सुरू झाल्याने असे प्रकार करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ जगदिश तांडेल यांनी केली आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

First Published on: October 18, 2019 1:14 AM
Exit mobile version