पोलीस पाटलाचा गावच्या सीमेवर पहारा तर प्रबोधनासाठी दोन युवक फिरताहेत गावोगाव

पोलीस पाटलाचा गावच्या सीमेवर पहारा तर प्रबोधनासाठी दोन युवक फिरताहेत गावोगाव

जगभरात चिंतेचा विषय बनलेल्या करोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहे. केवळ प्रशासकीय पातळीवरच नव्हे तर यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासलेले काही लोकदेखील पुढे येत आहे. संगमनेर-अकोलेतदेखील असेच सुखद चित्र दिसत असून संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ ग्रामस्थांनी बाहेर गावच्या व्यक्तींना बंदी घालण्यात आली आहे, यासाठी गावचे पोलिस पाटील गावच्या सीमेवर पहारा देत असून अकोले तालुक्यातील दोन तरुण प्रबोधनासाठी रस्त्यावर उतरले आहे. स्वत:च्या बोलेरो गाडीला भोंगा लावत ते नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करत आहेत.

करोनाविषयी संचारबंदी लागु करुनदेखील नागरिकांना फारसे गांभीर्य दिसत नसल्याचे सर्वत्र चित्र आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरु ठेवल्या गेल्या आहेत. मात्र संचारबंदीलाच हरताळ फासला गेल्याचे दिसते. रस्त्यावर केवळ पोिलस दिसत असले तरी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेकजण विनाकारण घराबाहेर पडतांना दिसतात. या स्थितीत संगमनेरच्या सावरगावतळ येथील ग्रामस्थांनी बाहेरच्या व्यक्तीला गावात येऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. गावपातळीवरील प्रमुख घटक असलेले गावचे कामगार पोलिस पाटील गोरक्ष नेहे गावातील लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत गावात येणाऱ्या पुणे, मुंबईसारख्या महानगरातून आणि देश परदेशातून येणाऱ्या बाहेरच्या लोकांवर लक्ष ठेऊन आहे. गावात या लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अश्या संशयितांची माहिती ते प्रशासनाला देत कायदा व सुव्यवस्था पार पाडण्याचे काम प्रशासनासोबत करत आहे.

दुसरीकडे अकोले तालुक्यातील संदीप शेणकर आणि नितीन नाईकवाडी या दोन युवकांनी नागरिकांचे प्रबोधन सुरु केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी त्यांनी आपल्या स्वत:च्या खर्चातून बोलेरो वाहनाला एक भोंगा लावत तालुक्यात ठिकठिकाणी याद्वारे नागरिकांना आवाहन करत प्रशासनाच्या निर्णयांची माहिती देण्याचे काम सुरु केले आहे. करोनाला लोक गांभीर्याने घेत नसल्याने हे युवक नागरिकांनी घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करत आहे. प्रशासनाकडून केवळ शहरांकडेच लक्ष दिले जात असल्याने ग्रामीण भागात यावर प्रबोधनाची आवश्यकता आहे. या युवकांनी स्वार्थ अथवा राजकारण मनात न ठेवता जनतेच्या हितासाठी काम सुरु केले आहे. अकोले शहरासह कारखाना रोड, कारखाना कार्यक्षेत्र, पानसरवाडी, परखतपुर, नवलेवडी, धुमाळवाडी, सुगाव, कळस, कुंभेफळ, वैद्य सुगाव, रेडे, खानापुर या भागात त्यांचे काम सुरु आहे.

नागरिकांना गांभीर्य नाही

तालुक्याच्या विविध भागात फिरल्यानंतर करोनासंदर्भात येथील नागरिकांना फारसे गांभीर्य दिसत नाही. स्थानिक प्रशासन करोनावर मात करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत असले तरी दुसरीकडे दहा-बारा लोक गर्दी करुन सार्वजनिक ठिकाणी गप्पांचा फड रंगवत आहेत. अशा बेजबाबदार नागरिकांना सरकार आणि स्थानिक प्रशासन जोपर्यत घरात बसण्याची सक्ती करणार नाही, नागरिक आपली जबाबदारी पार पाडत नाही तोपर्यत करोनावर मात अशक्य आहे. आपली एक चुक अनेकांसाठी मारक ठरु शकते, असे नितीन नाईकवाडी व संदीप शेणकर यांनी आपलं महानगरशी बोलतांना सांगितले.

First Published on: March 24, 2020 3:57 PM
Exit mobile version