संजय राठोड गायब नाहीत, गुरुवारी ते प्रकरणाचा खुलासा करणार- अजित पवार

संजय राठोड गायब नाहीत, गुरुवारी ते प्रकरणाचा खुलासा करणार- अजित पवार

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड गायब असल्याची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संजय राठोड गायब नाहीत, संपर्कात आहे, असं सांगितलं. गुरुवारी म्हणजे उद्या ते या प्रकरणावर भाष्य करणार असल्याची माहिती आहे, असं अजित पवार म्हणाले. बदनामी करण्यासाठी विरोधकांकडून आरोप होत आहेत. चौकशीमध्ये सगळं पुढे येईल, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही, असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी संजय राठोड यांच्यासोबत संपर्क झाला नसल्याचं देखील सांगितलं.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर संजय राठोड नॉट रिचेबल आहेत. यावर बोलताना अजित पवार यांनी संजय राठोड गायब नाहीत. ते गुरुवारी समोर येऊन स्पष्टीकरण देतील अशी माहिती मिळतेय, असं अजित पवार म्हणाले. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असं आम्ही सुरुवातीलाच सांगितलं आहे. पुणे शहर पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. काही लोकांना त्या प्रकरणात ताब्यात देखील घेतलं आहे. परंतु जो पर्यंत चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत निष्पाप व्यक्तींचं नाव घेऊन कारण नसताना त्यांना संशयाच्या भोवऱ्यामध्ये टाकणं उचित नाही. मागे धनंजय मुंडे यांच्याबाबत देखील तसंच झालेलं आपण पाहिलं, असं अजित पवार म्हणाले.

राजकीय क्षेत्रात अनेक वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारी ती व्यक्ती आहे. ज्या मुलीने आत्महत्या केली तीच्या वडिलांची प्रतिक्रिया मी स्वत: पाहिली. आर्थिक परिस्थितीचा ताण तिच्यावर होता असं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे. या प्रकरणात आज एकाला ताब्यात घेतलं आहे. अजून एक-दोनजणांना ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. एखाद्या मोठ्या व्यक्तीचं नाव आल्यानंतर त्या प्रकरणाला एक वेगळ्या प्रकारची प्रसिद्धी मिळत असते. चौकशीनंतर सर्व काही स्पष्ट होईल, असं अजित पवार म्हणाले. चौकशी होऊन संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही तोपर्यंत एखाद्याला दोषी ठरवून त्या पदावरुन हटवायचं हे कितपत योग्य आहे, हा विचार करण्यासारखा भाग आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल शिवसेना पक्षच भूमिका घेऊ शकतात, असं अजित पवार म्हणाले. यावेळई त्यांनी त्यांची त्रयस्थ भूमिका मांडली. जो पर्यंत चौकशीचा अंतिम अहवाल येत नाही तोपर्यंत सयंम ठेवणं महत्त्वाचं आहे, असं अजित पवार म्हणाले.

 

First Published on: February 17, 2021 7:44 PM
Exit mobile version