देखभाल दुरुस्ती अभावी शहापुरातील ऐतिहासिक माहुली गडाची दुरवस्था

देखभाल दुरुस्ती अभावी शहापुरातील ऐतिहासिक माहुली गडाची दुरवस्था

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष सांगणार्‍या शहापूर जवळील माहुली गडाची तटबंदी आता ढासळत चालली आहे.डागडुजी अभावी गडाची प्रचंड दुरावस्था व पडझड झाल्याचे वास्तव समोर येत आहे .राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे शहापूर तालुक्यातील ऐतिहासिक माहुली गडाचे अवशेष नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे .सह्याद्री पर्वतरांगा कडाकपारीत हिरव्यागार वृक्षांच्या दाट वनराईत उंच असा दिसतो तो माहुली गड या किल्ल्याचा इतिहास पाहता शहाजीराजांनी आदिलशाही विरुध्द जेव्हा युध्द पुकारले होते तेव्हा जिजाबाई व शिवबांना या किल्ल्यावर वास्तव्यासाठी शहाजीराजांनी आणले होते.

पुढे पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे २३ किल्ले मोघलांना दिले होते त्यात माहुली गडाचा समावेश होता.पळसगड व भंडारदरा गड यांना अगदी खेटून असलेला व सहयाद्रीच्या कुशीत असलेला हा बलशाली असा माहुली किल्ला आहे. किल्ला बघितल्यानंतर महाराष्ट्राचा शिवकालीन इतिहासच डोळ्यासमोर उभा राहतो चढण्यासाठी अत्यंत अवघड असणारा हा माहुली गड आजही दिमाखात उभा आहे. मात्र देखभाल व दुरुस्ती अभावी दुर्दैवाने शिवाजी महाराजांच्या काळातील या ऐतिहासिक ठेेेेवा असलेल्या व इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या अभेेद्य अशा गडाची तटबंदी आता सर्वत्र ढासळत चालेली असून गडाच्या वास्तूंची प्रचंड पडझड झाल्याचे चित्र नजरेस पडत आहे.गडाच्या महादरवाज्याची मुुख्य कमान तुटून पडली आहे.येथील कल्याण दरवाजा, हनुमान दरवाजा, गणेश दरवाजा यांची तर प्रचंड दुरवस्था झालेली दिसते आहे.मुघलांच्या काळातील नमाजगिराचे अवशेष दिसतात त्यांची देखील दुरवस्था झाल्याचे नजरेस पडते तर गडाच्या दगडी भिंती पण ढासळलेल्या आहेत. महादरवाज्याची दगडी पायर्‍यांची देखील तुटफुट होऊन फारच दुरवस्था झाली आहे.

महादरवाज्याचा रस्ता पडझडीमुळे बंद झालेला दिसतो आहे.येथील अनेक पार्‍या पावसाच्या पाण्यात वाहुन गेल्याचे दिसते गडावरील चार गुहांची पण पडझड झालेली आहे. पुरातन शिलालेख दगडी शिल्पाकृती लेण्यांचे छिन्नविच्छिन्न अवशेष हे भग्नावस्थेत स्थितीत इतरत्र पडून आहेत. येथील ऐतिहासिक पाण्याच्या तलावाची व एका टाक्याची गाळ साठल्यामुळे दैनवस्था झाली आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्ष झाल्याने ऊन, वारा, पाऊस आणि पुराच्या संकटामुळे या पुरातन गडाची पडझड होऊन आता दुर्दशा झाली आहे. माहुली गडाचे ऐतिहासिक अवशेष काही ठिकाणी मातीत गाडले गेलेले दिसत आहेत एकंदरीतच गडाची प्रचंड अशी दुर्दशा झाल्याचे हे भयानक असे चित्र माहुली गडाला भेट दिल्यास पाहण्यास मिळते आहे. लोकप्रतिनिधीसह राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने ऐतिहासिक माहुली गडाची वेळीच डागडुजी होऊ शकलेली नाही. तथापि ऐतिहासिक पुरातन किल्ल्याची वेळीच देखभाल आणि सुरक्षितता न ठेवल्याने या ऐतिहासिक गडाच्या इतिहासकालीन अवशेष दुरुस्ती व डागडुजी अभावी अखेरच्या घटक मोजत असून हा इतिहास नष्ट होण्याची भीती आता इतिहास तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. माहुली गडाची ही दुरवस्था पाहता आता वेळीच गडाची पुरातत्व विभागाकडून डागडुजी होणं गरजेचं आहे अशी मागणी सरकारकडे शिव प्रेमी व इतिहास प्रेमी करीत आहेत.

माहुली गडाची झालेली दुरावस्था व पडझड पाहता हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक वारसा कायम जतन ठेवण्यासाठी राज्यसरकाच्या पुरातत्व विभागाने गडाची तत्काळ पाहणी करुन गडाच्या तटबंदीचे व डागडुजीची कामे हाती घ्यावीत अशी आमची मागणी आहे.
– मनिष व्यापारी माहुली निसर्ग सेवा न्याय शहापूर

First Published on: June 18, 2020 3:32 AM
Exit mobile version