मराठीतही पॉर्न व्हिडिओचा सुळसुळाट !

मराठीतही पॉर्न व्हिडिओचा सुळसुळाट !

पॉर्न व्हिडिओ प्रकरणात गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलकडून अटकसत्र सुरू असताना खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. या पॉर्न रॅकेटकडून हिंदी, इंग्रजीसह मराठी पॉर्न व्हिडिओ देखील बनवण्यात येत होते. तसेच या रॅकेटमध्ये अनेक बड्या व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. लवकरच मुंबई पोलिसांकडून त्याबाबत खुलासा होणार आहे. गेली अनेक वर्षे हे पॉर्न रॅकेट मुंबईत कार्यरत असून तरुणींना फसवून त्यांना या पॉर्न व्हिडिओमध्ये जबरदस्तीने काम करण्यास प्रवृत्त केले जात होते. विशेष म्हणजे हे सर्व अश्लील व्हिडिओ या रॅकेटने कोरोना काळात तयार केल्याची माहिती उजेडात आली आहे.

मालवणीतील मढ परिसरातील एका बंगल्यातून पॉर्न व्हिडिओ बनविणार्‍या फिल्म प्रोडेक्शन टोळीचा पर्दाफाश केला होता, याप्रकरणी तीन महिलांसह सातजणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली असून ते सर्वजण बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत आहे. याच गुन्ह्यांत रविवारी उमेश कामत याला पोलिसांनी अटक केली होती. उमेश हा या टोळीमध्ये कॉर्डिनेटरचे काम पाहत होता. सध्या तो एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याच्या चौकशीनंतर सोमवारी शान बॅनर्जी याला पोलिसांनी अटक केली.

याच गुन्ह्यांत यापूर्वी अटक करण्यात आलेली निर्माता-दिग्दर्शक आणि स्मॉल टाईम अभिनेत्री रोझा खान ऊर्फ यास्मिन खान हिचा शान हा पती आहे. फोटोग्राफर असलेल्या शानच्या मालकीची एक कंपनी असून या कंपनीत तो संचालक म्हणून कार्यरत आहे. नऊ महिन्यांपूर्वीच त्याने स्वतची कंपनी सुरु केली होती. त्याला पॉर्न व्हिडिओची आधीपासून कल्पना होती. त्यात त्याच्या पत्नीचा सहभाग होता हेदेखील त्याला माहित होते. आतापर्यंतच्या पोलीस तपासात या टोळीने काही विदेशी कंपन्यांच्या सांगण्यावरुन पॉर्न व्हिडिओ बनविले होते. ते व्हिडिओ काही विदेशी सर्व्हर कंपन्यांना पाठविण्यात आले होते. ही जबाबदारी उमेश कामत आणि मालिका अभिनेत्री गहना वशिष्ठ यांच्यावर होती. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला होता. या व्यवहाराची माहिती जाणून घेण्यासाठी प्रॉपटी सेलने संबंधित बँकेशी पत्रव्यवहार सुरु केला आहे. उमेशच्या एका खात्याची तसेच गहनाच्या दोन खात्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे.

अमेरिकेतून येणारे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होत होते. या बँकेत कधी आणि किती रुपये जमा झाले, या पैशांची वाटणी कशा प्रकारे केली जात होती याचा तपास पोलीस करीत आहेत. तपासात या टोळीने आतापर्यंत अनेक तरुण-तरुणींना मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून या पॉर्न व्हिडिओमध्ये आणले होते. त्यांना ठराविक रक्कम दिली जात होती. यातील बहुतांश पॉर्न व्हिडिओ या टोळीने कोरोना काळात बनविले होते. मुंबईसह इतर ठिकाणी त्याचे चित्रीकरण झाले असून त्याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांना 50 हून अधिक पॉर्न अ‍ॅप्सची माहिती प्राप्त झाली आहे. या अ‍ॅपवर ते हिंदी, इंग्रजी आणि मराठी पॉर्न व्हिडिओ अपलोड करीत होते. एका अ‍ॅपवर एक हजार ते लाखापर्यंत सबस्क्रायबर आहेत. दिवसाला एक पॉर्न व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ संबंधित अ‍ॅप्सवर अपलोड केला जात होता. एका व्हिडिओसाठी त्यांना दोन लाख रुपये खर्च येत होता. त्यातून आलेली रक्कम उमेशकडून इतरांना दिली जात होती. सर्व व्यवहार ऑनलाईन होत होते असे पोलिसांनी सांगितले.

First Published on: February 9, 2021 10:56 PM
Exit mobile version