करोना संसर्ग स्टेज-३ मध्ये ?

करोना संसर्ग स्टेज-३ मध्ये ?

प्रातिनिधिक छायाचित्र

आपण ज्या परिस्थितीत आहोत ते तिसर्‍या स्टेज सारखीच आहे. मात्र त्याला अधिकृतरित्या आपण स्टेज ३ बोलू शकत नाही. हो, पण ही स्टेज ३ ची सुरुवात नक्कीच आहे. द क्विंट या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत कोविड १९ रुग्णालयाच्या टास्क फोर्सचे संयोजक डॉ. गिरधर ग्यानी हा दावा केला आहे.

भारतात करोना रुग्णांची संख्या ३१ हजार ५९९ वर पोहोचली आहे. २५ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आता जवळपास ३५ दिवस झाले आहेत. मात्र तरीही करोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. इतर देशांपेक्षा भारतात करोनाचा विस्फोट झालेला नाही. यावर आता यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चचा लॉकडाऊन जाहीर करण्याआधी काही तज्ज्ञ मंडळींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. त्यामध्ये डॉ. ग्यानी यांचा समावेश होता. निती आयोगाने करोना व्हायरसच्या संक्रमणाविरोधात लढण्यासाठी काही टास्क फोर्सची निर्मिती केली होती.

त्यापैकीच एक कोविड १९ रुग्णालय टास्क फोर्सचा डॉ. ग्यानी एक भाग आहेत. डॉ. ग्यानी हे इंजिनिअर असून त्यांनी दर्जा व्यवस्थापनात (Quality Management) पीएचडी मिळवली आहे. त्यांनी स्थापन केलेली असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोवाडर्स ही एनजीओ सरकारला आरोग्य क्षेत्रात धोरण आखण्यासाठी सल्ले देत असते.

करोना व्हायरसच्या तिसर्‍या स्टेजमध्ये व्हायरसचे समूहात संक्रमण झालेले असते. ही सर्वात अडचणीची आणि कठिण अशी स्टेज आहे. या स्टेजमध्ये व्हायरस झपाट्याने वाढत जातो आणि रुग्णाला करोनाची लागण कशी झाली? याचा कोणताही ठावठिकाणा लागत नाही. डॉ. ग्यानी यांनी सांगितले की, पुढचे पाच ते १० दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आतापर्यंत ज्यांना करोनाची लागण झाली आहे, त्यांच्यात लक्षणे दिसण्याचा हा काळ असेल. कोविड १९ चे हॉस्पिटल उभे करण्यासाठी आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. पुढच्या काही दिवसांत करोनाचा संसर्ग वाढू शकतो.

आपल्याकडे कोविडचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नाहीत. तसेच सरकार अजूनही सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास अडचण हे तीन लक्षणे असणार्‍यांचीच कोविड चाचणी करत आहे. जर एखाद्या रुग्णाला वरीलपैकी एकच लक्षण असेल तर त्याची चाचणी घेतली जात नाही. जे चुकीचे असून यात बदल झाला पाहिजे. सरकारने आपले धोरण बदलले पाहिजे. जर आपण एक लक्षण असणार्‍याचीही तपासणी सुरू केली तर व्हायरसच्या साखळीला आपण तोडू शकतो, असे डॉक्टर ग्यांनी यांनी सुचवले आहे.

First Published on: April 30, 2020 6:55 AM
Exit mobile version