प्रवीण दरेकरांवर झालेला गुन्हा रद्द करण्यात यावा, प्रसाद लाड यांची गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी

प्रवीण दरेकरांवर झालेला गुन्हा रद्द करण्यात यावा, प्रसाद लाड यांची गृहराज्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबै बँकेतील मजूर घोटाळा प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरेकरांवर गुन्हा दाखल केल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महाविकास आघाडी सरकारने खोटे गुन्हे कसे नोंदवायचे याची जंत्रीच लावली आहे, असं म्हणत प्रवीण दरेकरांवर झालेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे सदस्य आणि आमदार प्रसाद लाड यांनी सभागृहात गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे.

ज्या गुन्ह्यांमध्ये मुंबई बँकेच्या दहा चौकश्या लागल्या. या सर्व चौकश्यांमध्ये कोर्टाने कोणतीही कारवाई केली नाही. यामध्ये मजूर संस्थांचा देखील उल्लेख होता. तरीदेखील पुन्हा एक नवीन गुन्हा फोर्ट येथील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे, असं प्रसाद लाड म्हणाले.

या राज्यामध्ये २५ हजारांपेक्षा जास्त मजूर संस्था आहेत. यामध्ये २५ हजारांपैकी ९० टक्के हे सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहेत. या सदस्यांमध्ये मंत्र्यांचे आमदार, भाऊ आणि नातेवाईकांचा समावेश आहे. ३५ जिल्हा बँकेपैकी दोन सदस्यप्रमाणे ७० सदस्य या जिल्ह्याबँकेचे मजूर संस्थेमध्ये निवडून येणार आहेत. हे राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. असं असताना देखील प्रवीण दरेकरांनी मजूर संस्थेचा राजीनामा दिलेला आहे. ते आता सदस्य म्हणून बँकेमधून निवडून आले आहेत. तरीपण आज दरेकरांवर जो गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा कोणत्या मुद्द्यांवर दाखल करण्यात आला?, असा सवाल लाड यांनी उपस्थित केला.

मजूर सोसायटीचा जो कायदा आहे. त्यामध्ये संस्थेची नोंदणी करताना तो मजूर असावा लागतो, तो बंधनकारक आहे. परंतु तो मजूर आहे की नाही अशी कुठेही तरतूद या संस्थेमध्ये नाही आणि कायद्यामध्ये सुद्धा तशी तरतूद नाही. मग असं जर असेल तर संपूर्ण राज्यामधल्या मजूर संस्थावरती आणि त्यांच्या सदस्यांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार का?, असं लाड म्हणाले.

याआधी मुंबै बँकेची चौकशी झाली. कोणतीही चौकशी न करण्याची त्यामध्ये तरतूद आहे. असं असताना देखील आज जो गुन्हा दाखल केला. तो गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी आमची गृहराज्यमंत्र्यांकडे स्पष्टपणे मागणी असल्याचं प्रसाद लाड म्हणाले.


हेही वाचा : मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल, बोगस मजूर प्रकरणात होणार कारवाई


 

First Published on: March 15, 2022 2:35 PM
Exit mobile version