रुग्णाच्या मृत्यूची चौकशी लावा अन् कुटूंबीयांना ५० लाखांची मदत द्या – प्रवीण दरेकर

रुग्णाच्या मृत्यूची चौकशी लावा अन् कुटूंबीयांना ५० लाखांची मदत द्या – प्रवीण दरेकर

रुग्णाच्या मृत्यूची चौकशी लावा अन् कुटूंबीयांना ५० लाखांची मदत द्या - प्रवीण दरेकर

नाशिकमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्या असल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णसंख्या वाढली असल्यामुळे आरोग्य विभागावर आणि रुग्णालयांवर ताण निर्माण झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांमुळे सर्व रुग्णालये भरली आहेत. नव्या कोरोनाबाधित रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. बेड न मिळाल्याने कोरोना रुग्णाने ऑक्सिजन सिलेंडरसह नाशिक महापालिकेत आंदोलन केले होते. त्या रुग्णाचा आज १ एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत रुग्णाच्या मृत्यूची चौकशी लावून मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत देण्याची मागणी केली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय त्यातच राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या निष्क्रिय कारभाराचा आज नाशिकमध्ये बळी गेला आहे. रुग्णालयात बेड मिळत नसल्यानं ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणून स्वतःची जबाबदारी झटकू नका. असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. नाशिक मध्ये बेड अभावी आंदोलन करणाऱ्या रुग्णाच्या मृत्यूची तातडीने चौकशी लावा, आणि व्यवस्थेचा बळी ठरलेल्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत द्या. अशी मागणी प्रविण दरेकरांनी केली आहे.

देशाची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असताना महाराष्ट्रात कोरोनाची वाढ आणि दुरावस्था चिंता करणारी आहे. मी या सरकारचा तीव्र शब्दात धिक्कार करतो. नाशिकमधील दुरावस्थेचे चित्र जिल्हाधिकांऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मुख्यमंत्र्यांनाही याबाबत मी कल्पना दिली त्यांना पत्रही पाठवले होते. दुर्दैवाने नाशिकमधील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सरकारचे कोरोना निर्मूलनासाठी ज्या व्यवस्था उपलब्ध करायला हव्या होत्या त्यामध्ये सरकार अपयशी ठरले आहे. सरकारला संवेदना नाहीत. नागरिकांना कोरोनाने घाबरवण्याचे काम होत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.

First Published on: April 1, 2021 1:14 PM
Exit mobile version