President Visit Ambadwe Village : ७ नोव्हेंबर संपूर्ण देशात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा – राष्ट्रपती

President Visit Ambadwe Village : ७ नोव्हेंबर संपूर्ण देशात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा – राष्ट्रपती

President Visit Ambadwe Village : ७ नोव्हेंबर संपूर्ण देशात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा - राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे गावाला भेट दिली आणि या ठिकाणी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाची पूजा केली आणि भगवान बुद्ध, डॉ. आंबेडकर, श्रीमती रमाबाई आंबेडकर आणि रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी ७ नोव्हेंबर हा दिवशी संपूर्ण देशात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी विचार केला जाईल, असे राष्ट्रपती म्हणाले. यासाठी महाराष्ट्रातील खासदरांनी प्रयत्न करावे आणि त्या प्रयत्नांमध्ये मी तुम्हाला मदत करेन असा विश्वास यावेळी राष्ट्रपतींनी व्यक्त केला.  राष्ट्रपतींनी आंबडवे गावात मराठीतून भाषणाची सुरुवात केली. आपणा सर्वांना माझा नमस्कार म्हणत राष्ट्रपतींनी भाषणाला सुरुवात केली.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृर्ती स्थळावर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.  आंबेडकरांच्या गावाला भेट देऊन मला फार आनंद झाल्याचे राष्ट्रपतींने म्हटले.

राष्ट्रपती भाषणात म्हणाले, महाराष्ट्रात ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. त्याआधी २६ नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला. त्याचप्रमाणे ७ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी दिवस साजरा केला जातो. यादिवशी बाबासाहेब शाळेत गेले होते. त्यादिवशी एका नव्या युगाची सुरुवात झाली होती. विद्यार्थी दिवसाच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या आदर्श जोपासण्यात येतात. तर १४ एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी केली. बाबासाहेबांचे सर्व कार्यक्रम हे दयाळू, कायदेशीर नियम, समतावादी समाजाची कल्पना साकारण्यासाठी प्रेरित करतात. त्यामुळे ७ नोव्हेंबरला हा दिवस संपूर्ण देशात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी विचार करण्यात येईल. यासाठी खासदारांनी प्रयत्न करावे आणि मी तुमची यासाठी मदत करेन.

बाबासाहेबांच्या गावात यात्रा करणे हे माझ्यासाठी तीर्थ यात्रेसारखे आहे. भारत सरकारद्वारे पंच तीर्थाची कल्पना मांडण्यात आली आहे आणि ती साकार होत आहे. या पंच तीर्थ संकल्पनेत मंडणगड तालुक्यातील बाबासाहेंबाचे मुळ गाव आंबडवे गावाचा समावेश होईल, यासाठी देखील खासदारांनी प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे आंबडवे गावातील बाबासाहेबांच्या स्मृर्ती स्थळाचा समावेश देखील त्यांच्या तीर्थस्थळांमध्ये करावा, असे राष्ट्रपती म्हणाले. नागरिकांनी या स्थळी भेट देण्यासाठीकेंद्र आणि राज्य सरकारने योग्य सुविधा कराव्यात, अशा सूचना यावेळी राष्ट्रपतींनी दिल्या. रत्नागिरी जिल्ह्याने देशाला अनेक रत्ने दिली आहेत, यामध्ये भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर या अतिशय मौल्यवान रत्नाचा समावेश आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे हे नाव अर्थपूर्ण बनले आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे राष्ट्रपतींकडून कौतुक 

बाबासाहेबांच्या आंबडवे गावात भाषण करतेवेळी राष्ट्रपतींनी रत्नागिरी जिल्ह्याचे तोंडभरुन कौतुक केले.  यावेळी रत्नागिरीच्या हापूसचे राष्ट्रपतींने कौतुक केले. रत्नागिरी जिल्हा निसर्गाने नटलेला आहे.  हापूसचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचला आहे. हापूस आंबा खाल्ल्यानंतर तो कुठे पिकतो तर महाराष्ट्रात परंतु महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात तो पिकतो हे सर्वात विशेष आहे.  हापूस आंब्यात एक वेगळाच गोडवा आहे. आंब्याच्या गोडव्याप्रमाणेच इथल्या लोकांच्या वागण्यात आणि बोलण्यातही गोडवा आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याचा गोडवा संपूर्ण देशात आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी देशाला नवी दिशा दिली असे ते म्हणाले. त्यांचे वैयक्तिक जीवन हीच एक प्रकारची प्रेरणा आहे, असे त्यांनी सांगितले. मी ज्या ज्या वेळी बाबासाहेबांविषयी वाचतो, त्या त्या वेळी मी भारावून जातो. ते अतिशय बुद्धिमान विद्यार्थी होते आणि विविध विषयांचे ते विद्वान होते. एका गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला, पण सर्व अडचणींवर मात करत त्यांनी आपले शिक्षण सुरुच ठेवले. सामाजिक कुप्रथांचे उच्चाटन करण्याचा त्यांचा निर्धार आणि समाजाचे एकीकरण करण्याची वचनबद्धता असामान्य होती. आंबडवे गावातील विद्यार्थ्यांसाठी एक ग्रंथालय उभारण्याकरिता राज्यपाल विवेकानुदान निधीमधून 30 लाख रुपये निधी देण्याची यावेळी राज्यपालांनी घोषणा केली.


हेही वाचा – महाराष्ट्र भूमी मला वारंवार खेचून आणते

First Published on: February 12, 2022 1:44 PM
Exit mobile version