घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र भूमी मला वारंवार खेचून आणते

महाराष्ट्र भूमी मला वारंवार खेचून आणते

Subscribe

राष्ट्रपतींच्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटन

आपल्या संविधानानुसार ‘आपण भारतीय लोक’ देशाच्या सार्वभौमत्वाचे आधार आहोत. दरबार हॉलचा उद्घाटन समारंभ म्हणजे मला देशाच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव वाटतो. जनता सर्वश्रेष्ठ आहे आणि राजभवनासह दरबार हॉलदेखील लोककल्याणकारी कामांचे एक प्रभावी केंद्र बनेल, याची मला खात्री आहे, असे सांगतानाच महाराष्ट्राची जनता आणि या भूमीचे खास वैशिष्ट्य आहे, जे मला वारंवार याठिकाणी खेचून आणते.

गेल्या साडेचार वर्षात मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो आहे, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. मुंबईतील राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या दरबार सभागृहाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगीं राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि इतर निमंत्रित उपस्थित होते.

- Advertisement -

पुढे बोलताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले, राष्ट्रपती भवनाप्रमाणे हे राजभवनही आज जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या जनमानसातील आशा-आकांक्षांचे संवैधानिक प्रतीक ठरले आहे. याचा इतिहास ब्रिटिश सत्तेच्या वर्चस्वाशी बांधलेला असेलही, परंतु वर्तमान आणि भविष्य मात्र महाराष्ट्रासह पूर्ण देशाच्या गौरवगाथेशी जोडले गेले आहेत.

स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी दरबार हा शब्द राजसत्तेशी जोडलेला होता. मात्र, हा दरबार लोकशाहीशीच संबंधित आहे. लोकशाही व्यवस्थेत सुशासनासाठी सर्वात महत्वाची असते ती पारदर्शकता. दरबाराच्या व्यवस्थेत कोणतीही गोष्ट व्यक्तिगत नसते आणि गोपनीयही नसते. आता जनसेवक हे जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहण्याचा पायंडा पडत चालला आहे. अशाप्रकारे, नवीन संदर्भात, हे नवे दरबार सभागृह, आपल्या नवभारताचे, नवमहाराष्ट्राचे आणि चैतन्यमय लोकशाहीचे नवे प्रतीक आहे, असे राष्ट्रपती कोविंद यांनी सांगितले.

- Advertisement -

ऐतिहासिक दरबाल हॉल या वारसा वास्तूची वैशिष्ट्ये जपून ही नवनिर्मिती करण्यात आली आहे, याचा विशेष आनंद वाटतो. परंपरा सांभाळून काळाच्या गरजेनुसार आधुनिकतेची कास धरणे हे विवेकाचे लक्षण आहे असे ते म्हणाले .

दरबाल हॉलच्या उद्घाटनाप्रसंगी राज्याची जनता आणि सरकारचे अभिनंदन करत राष्ट्रपती म्हणाले की, महाराष्ट्र ही आध्यात्मिकतेची आणि त्याचवेळी अन्यायाविरुद्धच्या शौर्यपूर्ण संघर्षाची भूमी आहे. ही देवभक्तांची आणि देशभक्तांचीही भूमी आहे. महाराष्ट्र हे भारताचे महत्वाचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. अगत्यपूर्वक अतिथीसत्कार ही महाराष्ट्रातील लोकांची विशेष ओळख आहे. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे भारतातील आणि भारताबाहेरीलही अगणित लोकांना महाराष्ट्राला पुनःपुन्हा भेट द्यावीशी वाटते, असे राष्ट्रपती म्हणाले .

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपल्या कारकिर्दीत राजभवन परिसरात नैसर्गिक वैविध्याची जपणूक केली. काही वर्षांपूर्वी सापडलेल्या राजभवनातील ऐतिहासिक तळघराच्या वापराबाबतची त्यांची संकल्पना यावेळी स्पष्ट केली. महाराष्ट्रातील क्रांतीकारांची माहिती देणारी छायाचित्रे बंकरमध्ये लावणार असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

जुना वारसा जपून आपण आधुनिकीकरणाकडे चाललो आहोत हेच या वास्तूचे वैशिष्ट्य आहे आणि जुनी वैशिष्ट्ये कायम ठेवून नूतनीकरण करण्याचे आवाहन इथे पेलले आहे आणि पारतंत्र्याच्या घटनांची आठवण जपणारी वास्तू सशक्त लोकशाहीचा वारसा पाहण्यासही सज्ज झाली आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -