महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची चर्चा खरी ठरली

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची चर्चा खरी ठरली

राज्यात धुमाकूळ घालत असलेल्या करोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाआघाडी विकास सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव आज अखेर उघड झाला. याबाबत काल मध्यरात्रीपासून ‘माय महानगर’ आणि ‘आपलं महानगर’ने सर्वप्रथम ब्रेकिंग न्यूज दिली होती. आजच्या दिवसभरातील राजकीय घडामोडींनी महानगरने दिलेले राष्ट्रपती राजवटीचे वृत्त खरे असल्याबाबत शिक्कामोर्तबच केले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे देखील या बैठकीत उपस्थित होते. यावेळी राज्यातील करोनाचा वाढता फैलाव आणि केंद्र सरकारकडून सुरू असलेले असहकार्याचे धोरण यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लादली जाऊ शकते, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली होती. त्याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘दैनिक आपलं महानगर’ने दिले होते. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा होती. त्यातच भाजपने त्यांना बरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या राजभवनावर वाढलेल्या भेटीगाठी हादेखील चर्चेचा एक मोठा मुद्दा ठरला होता.

राज्यपालांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पवारांच्या या मातोश्री भेटीनंतर राज्यातील ठाकरे सरकार अडचणीत असल्याची चर्चा सुरू झाली. तसेच केंद्रातील भाजप सरकार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दलही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. शरद पवार यांनी जरी राज्यातील ठाकरे सरकार स्थिर असल्याबाबत आणि काँग्रेस, राष्ट्रवादी या सरकारच्या पाठीशी ठामपणे असल्याबाबत आज जाहीर केले असले तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मात्र दिल्लीमध्ये बोलताना महाराष्ट्रातील सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत स्थान दिले जात नाही.

मोठे निर्णय काँग्रेसला विश्वासात घेऊन केले जात नाहीत, असे सांगत महाआघाडी विकास सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या ‘दै. आपलं महानगर’च्या वृत्तावर ठळकपणे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभर ठाकरे सरकारच्या स्थिरतेबाबत तसेच राष्ट्रपती राजवटीबाबत भाजप, राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच्या नेत्यांना अनेक खुलासे द्यावे लागले.

First Published on: May 27, 2020 6:34 AM
Exit mobile version